क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील वाद ही आता सामान्य बाब झाली आहे. अनेकदा चालू सामन्यात खेळाडूंमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत असतात. मात्र, काळाच्या ओघात खेळाडू हे मतभेद विसरून पुन्हा मित्र बनतात. असाच काहीसा नजारा विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघांतील नवव्या सामन्यात पाहाला मिळाला. भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि नवीन उल हक हे पुन्हा मित्र बनले. दोघेही सामन्यानंतर एकमेकांशी हसत-हसत बोलताना दिसले. आता यावर भारतीय संघाची माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, जे काही झालं, ते विसरून गेलं पाहिजे. वेळेसोबत सर्वकाही बदलते आणि ही चांगली बाब आहे की, या दोघांनी आपसातील भांडण संपवले आहे.
काय म्हणाले शास्त्री?
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत असलेले रवी शास्त्री विराट आणि नवीनविषयी बोलताना म्हणाले की, “हा सर्व खेळाचा एक भाग आहे. जे काही झाले, ते आता घडून गेलेली गोष्ट आहे. तुम्हाला वेळेसोबत पुढे जावे लागते. वेळेसोबत सर्व गोष्टी ठीक होत जातात. खेळ तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. विराट कोहलीने सामन्यादरम्यान खिलाडूवृत्तीचा परिचय करून दिल्याचे पाहून चांगले वाटले. रागाच्या भरात दोघांमध्ये वाद झाला होता आणि इतर लोकही मध्ये आले होते. मात्र, या गोष्टी खेळात सुरूच असतात. मात्र, आज जे काही झाले, ते पाहून चांगले वाटले. या गोष्टीला सहा महिने लोटले आहेत आणि दोघांनीही विचार केला असेल की, आता हे संपवूया.”
विराट आणि नवीनची गळाभेट
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen Ul Haq) यांच्यात वाद झाला होता. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर हादेखील सामील होता. त्यामुळे जेव्हा नवीन उल हक दिल्लीतील भारताविरुद्धच्या सामन्यात उतरला, तेव्हा चाहत्यांनी त्याला ट्रोल करत कोहली-कोहलीचे नारे लावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने चाहत्यांना इशारा करत असे करण्यापासून रोखले. तसेच, सामन्यानंतर विराट आणि नवीन यांनी हस्तांदोलन करत एकमेकांची गळाभेट घेतली. यावरून असे दिसले की, दोन्ही खेळाडूंमधील भांडण संपले आहे.
हा सामना भारतीय संघाने 8 विकेट्सने जिंकला. या विजयासह भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता भारताला पुढील सामन्यात 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत. (world cup 2023 former cricketer ravi shastri reacts on virat kohli and naveen ul haq end rift with friendly embrace)
हेही वाचा-
विजय एक, विक्रम अनेक! भारताने विश्वचषकात रचले नवे Records, सातव्यांदा ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच संघ
भारत-अफगाणिस्तान सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्ये चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी- व्हिडिओ