Gautam Gambhir On Virat-Naveen Friendly Attitude : भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 9वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय नोंदवला. भारताच्या विजयापेक्षा जास्त चर्चा विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील मैत्रीची झाली. दोघांनीही सामन्यानंतर एकमेकांशी हसत संवाद साधत आपले भांडण संपवले. कदाचित हा सामना कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण अंदाज पाहायला मिळाला. आता याविषयी गौतम गंभीर याची प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधत आहे. चला तर, गंभीर काय म्हणाला जाणून घेऊयात….
विराट-नवीन वादाचा अंत
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen Ul Haq) यांच्यात बाचाबाची झाली होती. आता या वादावर दोन्ही खेळाडूंनी पडदा टाकला आहे. खरं तर, आयपीएलमध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, तर नवीन लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. तसेच, गौतम गंभीर (Gautam Gambhir) लखनऊचा मार्गदर्शक आहे. या संघातील एका सामन्यादरम्यान विराट आणि नवीनमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर सामना संपल्यावर हस्तांदोलन करताना पुन्हा एकदा वातावरण तापले होते. नवीनने विराटचा हात झटकला होता. या वादात गंभीरनेही एन्ट्री केली होती. त्यानंतर वाद आणखीच वाढला होता.
दोघांमध्ये मैत्रीपूर्ण अंदाज
आयपीएल 2023 स्पर्धेत झालेल्या वादानंतर आता विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील भारत-अफगाणिस्तान सामन्यात विराट-नवीनचा मैत्रीपूर्ण अंदाज पाहायला मिळाला. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याचा सामना नवीन उल हक (Naveen Ul Haq) याच्या चेंडूंशी झाला. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री पाहायला मिळाली. स्टेडिअममध्ये बसलेले विराटचे चाहते नवीनला चिडवत होते. यानंतर विराटने इशारा करत चाहत्यांना असे न करण्यास सांगितले. काही वेळानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि हसत हसत संवाद साधला. याविषयी आता गंभीरने प्रतिक्रिया दिली.
This is some content pic.twitter.com/HsIxhmlbCt
— 𝙋𝙧𝙖𝙩𝙮𝙪𝙨𝙝 𝙎 (@ps26_11) October 12, 2023
काय म्हणाला गंभीर?
गंभीर म्हणाला की, “भांडण हे मैदानात होते, बाहेर नाही. प्रत्येक खेळाडूला आपल्या संघ आणि विजयासाठी लढण्याचा अधिकार आहे. हे महत्त्वाचे नसते की, तुम्ही कोणत्या देशाचे किंवा कोणत्या दर्जाचे खेळाडू आहात. आपण आज एक चांगली गोष्ट पाहिली की, विराट आणि नवीनमधील वाद संपला आहे.”
तो पुढे म्हणाला की, “विराट कोहलीने प्रेक्षकांना नवीनची चेष्टा करू नये, असे सांगणे ही एक उत्तम कृती होती. मला आशा आहे की, पुढील सामन्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, चाहते त्याला ट्रोल करणार नाहीत. प्रत्येकाने अनेक त्याग केलेला असतो. तुम्ही पाठिंबा द्या किंवा नाही, पण त्याची चेष्टा करू नका.”
नवीनविषयी बोलताना गंभीर म्हणाला की, “मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की, सोशल मीडियावर कुणालाही ट्रोल करणे किंवा चुकीच्या प्रकारे टार्गेट करणे योग्य नाहीये. तुम्हाला हे समजले पाहिजे की, नवीन पहिल्यांदा आयपीएल खेळला होता. तो अफगाणिस्तानसाठी खेळतो, जी त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे.”
दोघांची सामन्यातील कामगिरी
या सामन्यात आधी फलंदाजी करताना नवीनने 8 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 9 धावा केल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना 5 षटकात 31 धावा खर्च केल्या, पण एकही विकेट मिळाली नाही. दुसरीकडे, विराट कोहली याने अफगाणिस्तानच्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून 56 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. (world cup 2023 ind vs afg 9th match virat naveen showed friendly attitude in india afghanistan match gautam gambhir reaction goes viral)
हेही वाचा-
विराट-नवीनमध्ये झालेल्या मैत्रीबद्दल रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘आज जे काही झाले…’
विजय एक, विक्रम अनेक! भारताने विश्वचषकात रचले नवे Records, सातव्यांदा ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच संघ