‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा अंतिम सामना गेल्या दोन हंगामांपासून इंग्लंडमध्ये आयोजित केला जात आहे. मात्र आता हा सामना इंग्लंडऐवजी दुसऱ्या देशात खेळला जाऊ शकतो. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तसे संकेत दिले आहेत. याबाबत आपण आयसीसीशी बोललो असल्याचं ते म्हणाले.
आयसीसीनं जेव्हापासून ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून स्पर्धेचा अंतिम सामना फक्त इंग्लंडमध्येच खेळला जात आहे. आतापर्यंत इंग्लंडमध्ये दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला. विशेष म्हणजे, भारतीय संघानं दोन्ही वेळा फायनलपर्यंत मजल मारली होती, परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात न्यूझीलंडनं साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. त्यानंतर लंडनमध्ये दुसऱ्या हंगामात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पुढील फायनलही इंग्लंडमध्ये होणार आहे. यावेळी ही मॅच लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळली जाईल. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अंतिम सामना दुसऱ्या देशात हलवण्याचे संकेत दिले आहेत. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं याबाबत आयसीसीशी चर्चा केली असून ते ठिकाण बदलण्याचा विचार करतील.
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. परंतु संघ अद्याप विजेतेपद पटकावू शकलेला नाही. टीम इंडियानं सलग दोनदा अंतिम फेरी गाठली, परंतु दोन्ही वेळा संघाला इंग्लिश परिस्थितीत पराभवाचा सामना करावा लागला. साधारणपणे इंग्लंडमधील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते. वेगवान गोलंदाजांना तेथे भरपूर सीम आणि स्विंग मिळते. यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघांना येथे थोडा अतिरिक्त फायदा मिळतो. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल हलवली तर ती कुठे खेळली जाणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार बदलाच्या चर्चांवर लखनऊच्या मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण, केएल राहुलकडेच असणार संघाचं नेतृत्व