वूमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या 18व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु महिला संघाने शानदार कामगिरी करत यूपी वॉरियर्स महिला संघावर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने थेट फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले असून WPL 2026 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला संघ ठरला आहे.
नाणेफेक जिंकत आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 143 धावा केल्या. यूपीची सुरुवात चांगली झाली. पहिल्या 8 षटकांत कोणतीही विकेट न गमावता संघाने 74 धावा फलकावर लावल्या. मात्र, नवव्या षटकात कर्णधार मेग लॅनिंग 30 चेंडूत 41 धावा करून बाद झाली आणि यूपीला पहिला धक्का बसला. त्यानंतर एमी जोन्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली.
आरसीबीकडून नादिन डी क्लार्कने प्रभावी गोलंदाजी करत हरलीन देओलला 14 धावांवर बाद केले. पुढे क्लो ट्रायन 6 धावांवर, तर श्वेता सेहरावत केवळ 7 धावा करून माघारी परतली. दीप्ती शर्मा हिने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावले, मात्र 19व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ती 55 धावांवर बाद झाली. अखेरीस यूपी वॉरियर्सला 143 धावांपर्यंतच मजल मारता आली.
या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने आक्रमक सुरुवात केली. ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधना या सलामीवीरांनी यूपीच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. अवघ्या 9 षटकांत बिनबाद 108 धावा केल्यानंतर ग्रेस हॅरिस 37 चेंडूत 75 धावांची झंझावाती खेळी करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार स्मृती आणि जॉर्जिया वोल यांनी संयम राखत संघाला विजयाकडे नेले. आरसीबीने 14व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लक्ष्य गाठत सामना आपल्या नावावर केला.
या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु महिला संघाने WPL 2026 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला असून, विजेतेपदाच्या दिशेने आपला दावा अधिक भक्कम केला आहे.






