---Advertisement---

WTC Final 2021: न्यूझीलंड म्हणजे कसोटी’किंग’, भारताला पराभूत करत पटकावले पहिलेवहिले विश्वविजेतेपद

On: बुधवार, जून 23, 2021 11:05 PM
---Advertisement---

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता होण्याचा मान न्यूझीलंडला मिळाला आहे.

या सामन्यातील २ दिवस पावसामुळे वाया गेले असल्याने बुधवारी (२३ जून) राखीव दिवशीही खेळ झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला १३९ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद ९६ धावांची अर्धशतकी भागीदारी केली आणि न्यूझीलंडला २१ वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद मिळवून दिले.

यापूर्वी न्यूझीलंडने शेवटचे आयसीसी विजेतेपद २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवले होते. त्यावेळीही अंतिम सामन्यात भारतालाच पराभूत केले होते.

टेलर-विलियम्सनची अर्धशतकी भागीदारी 

न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे यांची जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली आहे. या दोघांनीही सावध सुरुवात करत दुसरे सत्र संपेपर्यंत विकेट जाऊ दिली नाही. मात्र, अखेरच्या सत्रात लॅथमला ९ धावांवर डावाच्या १४ व्या षटकात ९ धावांवर आर अश्विनने बाद केले.

यानंतर कॉनवेने कर्णधार केन विलियम्सनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही अश्विचनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. कॉनवेने १८ व्या षटकात १९ धावांवर अश्विन विरुद्ध पायचीत होत आपली विकेट गमावली. त्यामुळे न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला.

पण, त्यानंतर विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी भारतीय गोलंदाजांना आणखी यश मिळवून दिले नाही. त्यांनी न्यूझीलंडला अनुभवाचा वापर करत विजयापर्यंत नेले. या दोघांनीही काही चांगले फटके खेळताना सातत्याने धावफलक हलता राहिल, याची काळजी घेतली. तसेच विलियम्सनने त्याचे अर्धशतकही ८६ चेंडूत पूर्ण केले. त्यामुळे न्यूझीलंडसाठी हा विजय सहज सोपा झाला. न्यूझीलंडने विलियम्सन आणि टेलरच्या भागीदारीमुळे ४५.५ षटकात १४० धावा करत विजय मिळवला. टेलरने विजयी चौकार खेचला. टेलरने १०० चेंडूच ६ चौकारासह नाबाद ४७ धावा केल्या. तर विलियम्सनने ८९ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ५२ धावा केल्या.

न्यूझीलंडला १३९ धावांचे लक्ष्य

भारताचा दुसरा डाव ७३ षटकांत १७० धावांवर संपुष्टात आला असून पहिल्या डावातील ३२ धावांच्या पिछाडीमुळे भारताने न्यूझीलंडला १३९ धावांचे आव्हान दिले आहे.

या डावात भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तर रोहित शर्माने ३० धावांचे योगदान दिले. अन्य कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने ३, काईल जेमिसनने २ आणि नील वॅग्नरने १ विकेट घेतली.

भारताची तळातील फलंदाजी कोलडली

पहिल्या सत्रात काईल जेमिसनने भारताला दोन मोठे धक्के दिल्यानंतर रविंद्र जडेजा आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरला होता. त्यांनी दुसऱ्या डावातही सुरुवातीला चांगला खेळ करत धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली. मात्र, ६३ व्या षटकात नील वॅग्नरने जडेजाला बीजे वॉटलिंगकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे ४९ चेंडूत १६ धावा करुन जडेजा माघारी परतला.

त्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या पंतला ७० व्या षटकात ट्रेंट बोल्टने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका मारायच्या नादात पंत हेन्री निकोल्सच्या हातून झेलबाद झाला. त्याने ८८ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यापाठोपाठ आर अश्विनलाही बोल्टने त्याच षटकात बाद करत भारताला ८ वा धक्का दिला.

यानंतर मोहम्मद शमीने बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ३ चौकारांसह १३ धावा करुन तो साऊथीविरुद्ध खेळताना बाद झाला. अखेर साऊथीनेच जसप्रीत बुमराहला बाद केल्याने भारताचा डाव १७० धावांवर संपुष्टात आला.

जडेजा, पंतने सावरला डाव

बुधवारी भारतीय संघाने दुसऱ्या डावात २ बाद ६४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी सुरुवातीला सावध खेळ करत धावफलक हलता ठेवला होता. मात्र, पुन्हा एकदा विराट काईल जेमिसनच्या जाळ्यात अडकला आणि डावाच्या ३६ व्या षटकात यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगकडे झेल देऊन बाद झाला. त्याने १३ धावा केल्या.

त्याच्यापाठोपाठ ३८ व्या षटकात पुजारा देखील जेमिसन विरुद्ध खेळताना रॉस टेलरकडे झेल देऊन १५ धावांवर बाद झाला. त्यामुळे सध्या खेळपट्टीवर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांची नवी जोडी होती. पण, रहाणेही जास्तवेळ तग धरु शकला नाही. तो ५० व्या षटकांत ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळताना १५ धावांवर वॉटलिंगडे झेल देऊन बाद झाला. त्याच्यानंतर मात्र, जडेजाने पंतला भक्कम साथ दिली. या दोघांनी पहिले सत्र संपेपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही.

त्यामुळे दुसऱ्या डावात भारताने पहिल्या सत्राखेर ५५ षटकात ५ बाद १३० धावा केल्या असून पहिल्या डावातील ३२ धावांच्या पिछाडीमुळे भारताकडे ९८ धावांची सध्या आघाडी आहे. जडेजा १२ धावांवर आणि पंत २८ धावांवर नाबाद आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---