सध्या श्रीलंकेत एमर्जिंग एशिया कप स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए यांच्या दरम्यान सुरू असून, या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा बनवल्या. फलंदाजांना काहीशा कठीण असलेल्या या खेळपट्टीवर भारतीय कर्णधार यश धूल याने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवत अर्धशतक झळकावले.
या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत भारताची अवस्था एक वेळ 4 बाद 90 अशी केली होती. या बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये फॉर्ममध्ये असलेले साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, नितीन जोस व निशांत सिंधू हे होते. त्यावेळी यश याने आपल्यावरील जबाबदारी ओळखत इतर फलंदाजांना हाताशी घेत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नेले.
यशने 85 चेंडूंचा सामना करताना सहा चौकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. तो भारतीय संघाचा बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. यश हा या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. युएईविरूद्धच्या सामन्यात त्याने फलंदाजी करताना नाबाद 108 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध देखील त्याने नाबाद 21 धावा केल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा अर्धशतक करत त्याने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले.
भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास ते स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होतील. पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करत, अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मागील वेळी झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने विजय संपादन केला होता.
(Yash Dhull Fine Form Continues In Emerging Asia Cup Hits Fifty Against Bangladesh)
महत्वाच्या बातम्या –
सलामीवीर बनताच रोहितची कारकीर्द गेली टॉपवर! एकदा आकडेवारी पाहूनच घ्या
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती