BREAKING: पंतकडून फलंदाजीला सुरुवात, बुमराह, केएल राहुल व अय्यरची प्रोग्रेसही घ्या जाणून

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी (20 जुलै) महत्वाची माहिती दिली. बीसीसीआयच्या माहितीनुसार रिषभ पंत लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांच्या फिटनेसविषयी देखील चांगली बातमी बीसीसीआयकडून मिळाली. एकूण पाच खेळाडूंवरच्या फिटनेसबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हे भारतीय संघाचे दोन वेगवान गोलंदाज मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहेत. बुमराहने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तसेच प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2022मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. हे दोन्ही गोलंदाज बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मागच्या काही महिन्यांपासून फिटनेस मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. बीसीसीआयकडून मिळाल्या माहितीनुसार दोन्ही वेगवान गोलंदाजांनी चांगली फिटनेस मिळवली आहे आणि रिहॅबच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. एनसीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या काही सराव सामन्यांमध्ये हे दोघेही खेळतील. या सामन्यातील प्रदर्शानंतर बीसीसीआय त्यांच्यातील सुधारणा तपासून पाहील आणि त्यावरून पुढचा निर्णय घेतला जाईल.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) डिसेंबर 2022मध्ये झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याला चांगलीच दुखापत झाली होती, ज्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरला नाहीये. असे असले तरी, पंतने आता फलंदाजी आणि यष्टीरक्षण करायला पुन्हा सुरुवात केली आहे, असे बीसीसीआयने सांगितले. पंत आपल्या फिटनेसची माहिती अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. रिषभ पंत (Rishabh Pant) अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने स्वतःमाध्ये सुधारणा करत असल्याचेही सांगितले जात आहे.
या तिघांव्यतिरिक्त केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोघेही मागच्या काही महिन्यांपासून एनसीएसमध्ये सराव करत आहेत. राहुल आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता. पण लीगदरम्यानच त्याला दुखापत झाल्याने अर्ध्या हंगामातून माघार घेतली होती. दुसरीकडे श्रेयस अय्यर यावर्षी ऑस्ट्रेलियन संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतात आला होता. मालिकेतील चौथ्या सामन्यात अय्यरला पाठीची दुखापत उद्भवली आणि त्याला मैदान सोडावे लागले. असे असले तरी, यांनीही नेट्समध्ये फलंदाजीला सुरुवात केली आहे आणि मेडिकल टीम त्यांच्यातील सुधारणा पाहून समाधानी आहे. आगामी काळात या पाचही खेळाडूेंची फिटनेस भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे.
यावर्षी आशिया चषक आणि वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते या खेळाडूंना तयार करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. एनसीए देखील यासाठी प्रयत्नशील आहे. (The BCCI confirms Rishabh Pant has started batting and wicketkeeping in the nets.)
महत्वाच्या बातम्या –
मोईनने निवडली सीएसकेची ‘ऑल टाईम ग्रेट’ इलेव्हन! ही नावे चकित करणारी, तुम्हीही पाहा
पाँटिंगच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ऑस्ट्रेलियन संघाला अपयश! मॅनचेस्टर कसोटीत गोलंदाजांनी केली ‘ही’ चूक