---Advertisement---

धावांचा रतीब घालणारा यशस्वी जयस्वालने केलाय हा मोठा पराक्रम

---Advertisement---

पोचेफस्टरूम| आज(9 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.2 षटकात सर्वबाद 177 धावा करत बांगलादेशला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे.

भारताकडून सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी करत एकाकी झूंज दिली. याबरोबच त्याने एक खास विक्रम केला आहे. त्याने 121 चेंडूत 88 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

त्याचबरोबर 19 वर्षांखालील 2020 विश्वचषकात त्याने 400 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. त्याचे आता 19 वर्षांखालील विश्वचषकात 6 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 133.33 च्या सरासरीने 400 धावा झाल्या आहेत.

त्यामुळे तो एका 19 वर्षांखालील विश्वचषकात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा शिखर धवननंतरचा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी शिखरने 2004 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात 7 सामन्यात 505 धावा केल्या होत्या. शिखर एका 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.

तसेच यशस्वी हा 2020 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे. त्यामुळे एका 19 वर्षांखालील विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होणारा तो एकूण चौथा भारतीय आहे.

याआधी शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि तन्मय श्रीवास्तव यांनी हा कारनामा केला आहे. शिखर 2004 च्या, पुजारा 2006 च्या आणि श्रीवास्तव 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते.

आज सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक 2020 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून यशस्वी व्यतिरिक्त केवळ तिळक वर्मा(38) आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव चंद जुरेल(22) यांंनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली आहे. अन्य भारतीय फलंदाज एक आकडी धावसंख्येवरच बाद झाले.

बांगलादेशकडून अविषेक दासने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शोरीफुल इस्लाम आणि तान्झिम हसन साकिब यांनी प्रत्येकी 2 विकेट्स तर राकिबुल हसनने 1 विकेट घेतली.

#एका 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय –

505 – शिखर धवन, 2004

400 – यशस्वी जयस्वाल, 2020

372 – शुबमन गिल, 2018

355 – सर्फराज खान, 2016

349 – चेतेश्वर पुजारा, 2006

#प्रत्येक 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

1988 – ब्रेट विलियम्स – 471 धावा (ऑस्ट्रेलिया)

1998 – ख्रिस गेल – 364 धावा (वेस्ट इंडिज)

2000 – ग्रॅमी स्मिथ – 348 धावा (दक्षिण आफ्रिका)

2002 – कॅमेरॉन व्हाईट – 423 धावा (ऑस्ट्रेलिया)

2004 – शिखर धवन – 505 धावा (भारत)

2006 – चेतेश्वर पुजारा – 349 धावा (भारत)

2008 – तन्मय श्रीवात्सव – 262 धावा (भारत)

2010 – डॉमनिक हेन्ड्रिक्स – 391 धावा (दक्षिण आफ्रिका)

2012 – अनामुल हक – 365 धावा (बांगलादेश)

2014 – शादमन इस्लाम – 406 धावा (बांगलादेश)

2016 – जॅक बुम्हम – 420 धावा (इंग्लंड)

2018 – अ‍ॅलिक अथनाझ – 418 धावा (वेस्ट इंडिज)

2020 – यशस्वी जयस्वाल – 400 धावा (भारत)

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---