बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल वेगळ्याच अंदाजात दिसला. कानपूरमध्ये त्यानं शानदार फलंदाजी केली. यशस्वीनं 51 चेंडूंचा सामना करत 72 धावा केल्या. या खेळीत त्यानं 12 चौकार आणि 2 षटकार मारले. या सामन्यात यशस्वीनं अवघ्या 31 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्यानं दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.
यशस्वी जयस्वालनं कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी संयुक्त तिसरं जलद अर्धशतक ठोकलं आहे. त्याच्याशिवाय अष्टपैलू शार्दुल ठाकूरनं 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. शार्दुलनं 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. वीरेंद्र सेहवागनं 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध 32 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा चमत्कार केला होता. या कामगिरीसह यशस्वी जयस्वाल कसोटीमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा सलामीवीर बनला आहे. भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम रिषभ पंतच्या नावे आहे. त्यानं 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 28 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.
कसोटीमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक (चेंडू)
रिषभ पंत – 28
कपिल देव – 30
यशस्वी जयस्वाल – 31
शार्दुल ठाकूर – 31
वीरेंद्र सेहवाग – 32
भारतानं पहिल्या डावात धमाकेदार सुरुवात केली. यशस्वीनं कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 55 धावा जोडल्या. या दोघांमुळे भारतानं अवघ्या 3 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये हा नवा विक्रम आहे. रोहित चौथ्या षटकात मेहदी हसन मिराजचा बळी ठरला. त्यानं 11 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 23 धावा केल्या. भारतानं या सामन्यात 10.1 षटकात 100 धावा पूर्ण केल्या. हा देखील एक नवा विक्रम आहे.
हेही वाचा –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, रोहित-यशस्वीच्या जोडीनं केला महापराक्रम!
जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!
रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO