भारतात सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने झारखंडविरुद्ध खेळताना आज(16 ऑक्टोबर) द्विशतक झळकावले आहे.
त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून 154 चेंडूत 203 धावांची खेळी करताना 17 चौकार आणि 12 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याचे आज वय 17 वर्षे 292 दिवस आहे. त्यामुळे अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.
यशस्वी मागील अनेक दिवसांपासून 19 वर्षांखालील भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
मागीलवर्षी जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाल्याने प्रकाशझोतात आलेल्या यशस्वी जयस्वालने क्रिकेट खेळण्यासाठी पाणीपुरीची गाडीही चालवली आहे.
यशस्वी वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन एकटा उत्तर प्रदेशमधील भदोहीहून मुंबईत आला. त्याने मुंबईमध्ये आझाद मैदानावरील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये कित्येक दिवस उपाशी पोटी काढले मात्र त्याने आपली जिद्द सोडली नाही.
त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची असूनही वडील त्याला पैसे पाठवायचे मात्र तेवढे पैसे त्याला पुरत नव्हते. त्यासाठी त्याला पाणीपुरीचा गाडाही चालवावा लागला.
यशस्वी जयस्वालच्या खेळावर 19 वर्षाखालील मुंबई संघाचे प्रशिक्षक सतिश सामंत प्रभावित झाले. त्यांनी यशस्वी पुढे जाऊन मुंबई क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावणार असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच सतिश सामंत यांनी यशस्वी जयस्वालच्या यशाचे श्रेय त्याच्या मुस्लिम युनायटेड क्लबचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांना दिले आहे. यशस्वीही त्याच्या यशाचे श्रेय ज्वाला सिंग यांनांच देतो.
यशस्वीनेही मेहनत घेत 19 वर्षांखालील भारतीय संघात आपली जागा पक्की केली. त्याने मागीलवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 85 धावांची खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम केला. तसेच त्याच्या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला.
यशस्वीने यावर्षी जानेवारीमध्ये मुंबईकडून छत्तीसगढ़विरुद्ध रणजी ट्रॉफीमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणही केले आहे. तसेच त्याने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीतून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याने 5 सामन्यात 100.80 च्या सरासरीने 2 शतके आणि 1 द्विशतकासह तब्बल 504 धावा केल्या आहेत.
यशस्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वासिम जाफर यांना आदर्श मानतो. तसेच त्याने इंडियन ऑइलसाठी जाफरबरोबरही क्रिकेटही खेळले आहे. जाफरने दिलेल्या सल्ल्याचाही खेळताना उपयोग झाल्याचेही यशस्वीने सांगितले आहे.
तसेच यशस्वी मागीलवर्षी श्रीलंका विरुद्धच्या मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही भेटला आहे. त्यावेळी सचिनने यशस्वीला सामन्याचा आनंद घे, पूर्णपणे खेळाकडे लक्ष, असा सल्ला देखील दिला होता. तसेच सचिनने त्याची बॅट यशस्वीला भेट म्हणूनही दिली होती.