India vs England 1st Test: हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 371 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने एकही विकेट न गमावता 181 हून अधिक धावा धावफलकावर लावल्या आहेत. डकेटने आपले शतक पूर्ण केले आहे, तर क्रॉलीनेही अर्धशतक झळकावले.
आधीच चिंतेत असलेल्या भारतीय गोलंदाजांची धाकधूक यशस्वी जयस्वालने आणखी वाढवली आहे. यशस्वीने या पहिल्याच कसोटी सामन्यात चौथ्यांदा एकच चूक पुन्हा केली आहे. यशस्वीकडून झालेल्या या चुकीमुळे मोहम्मद सिराजचा अक्षरशः संताप झाला आणि तो खूप नाराज दिसला.
बेन डकेट आणि जॅक क्रॉली कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडला वेगाने विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत. या दोघांमध्ये 150 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. डकेटने शतक झळकावले आहे, तर क्रॉलीही उत्कृष्ट लयीत दिसत आहे. पहिल्या सत्राच्या नंतर दुसऱ्या सत्रातही आतापर्यंत भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आलेली नाही. डावाच्या 39व्या षटकात मोहम्मद सिराजने एक संधी निर्माण केली, पण जयस्वालने सीमारेषेवर तो झेल सोडून दिला. (Yashasvi Jaiswal Dropped Catch)
सिराजच्या चेंडूवर डकेटने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट खेळला आणि यशस्वी चेंडूच्या दिशेने वेगाने धावला. यशस्वी चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्याने डाईव्ह मारून झेल पकडण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू यशस्वीच्या हाताला लागून निसटला. झेल सुटताच सिराज खूप निराश दिसला आणि तो रागाने ओरडतानाही दिसला. (Mohammed Siraj Angry)
Unending Story From Yashaswi Jaisalwal ; Never Caught A Catch In Important Time . Measure Reason For Lose #INDvsENG #INDvsENGTest #YashaswiJaiswal pic.twitter.com/b36l52rDUt
— Saqlain (@SaqlainHameeed) June 24, 2025
इंग्लंडविरुद्ध हेडिंग्लेमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने हा चौथा झेल सोडला आहे. यापूर्वी, पहिल्या डावातही यशस्वीने 3 झेल सोडले होते आणि हे सर्व झेल जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आले होते. एकाच सामन्यात यशस्वीपेक्षा जास्त झेल आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने सोडले नाहीत. हा एक लाजिरवाणा रेकाॅर्ड यशस्वीने नको असतानाही आपल्या नावावर नोंदवला आहे. (Most Catches Dropped in Test Match)






