बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. सलग ५ सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया संघाने पराभूत केल्याने त्यांचा संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. यानंतर आता पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी यासिर शाहला संघात स्थान देण्यात आले नाहीये. तो अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी फिरकीपटू बिलाल आसिफला संधी देण्यात आली आहे. तसेच या संघात सलामीवीर फलंदाज इमाम उल हकचे देखील पुनरागमन झाले आहे. परंतु यासिर शाह संघाबाहेर झाल्यामुळे पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण यासिर शाह एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा विक्रम आहे. तसेच तो माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इंजमाम उल हकचा भाचा आहे.
मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांनी म्हटले की, “बिलालची यासिरच्या जागी निवड करण्यात आली आहे. यासिर सध्या अंगठ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळे तो कायदे-ए-आझम ट्रॉफी या देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेतही खेळू शकणार नाहीये.”
पाकिस्तान संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज यासिर शाह याने जुलै -ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. निवडकर्त्यांनी ऑफ-स्पिनर साजिद खान आणि लेग-स्पिनर जाहिद महमूदलाही या संघात स्थान दिले आहे.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान खेळला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.
बांगलादेश दौऱ्यासाठी असा आहे पाकिस्तान संघ : बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, आबिद अली, अजहर अली, बिलाल आसिफ, फहीम अशरफ, फवाद आलम, हसन अली, इमाम उल हक, कामरान गुलाम, मोहम्मद अब्बास, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नौमान अली, साजिद खान, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहीन शाह अफरीदी, जाहिद महमूद.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकातून वगळण्याबाबत भारताच्या चहलने सोडले मौन; म्हणाला, “मला ४ वर्षे संघाबाहेर…”
न्यूझीलंडविरुद्ध पाहायला मिळणार रोहितचा ‘हिटमॅन’ अवतार! विराट, गप्टिलला पछाडत करणार भीमपराक्रम