भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान उद्यापासून (१७ डिसेंबर) चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरु होईल. मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरूपात ऍडलेड येथे खेळवला जाईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव स्मिथ या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी भारतीय संघाने स्मिथविरूद्ध कशाप्रकारे गोलंदाजी करावी हे सांगितले आहे.
स्मिथला करा अशी गोलंदाजी
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेबद्दल सातत्याने आपली मते व्यक्त करत असलेल्या चॅपेल यांनी स्टीव स्मिथला भारतीयानी कशी गोलंदाजी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. चॅपेल म्हणाले, “स्मिथ एक अप्रतिम फलंदाज आहे. तुम्ही त्याला आखूड टप्प्याचे चेंडू टाकू शकत नाही. तशी गोलंदाजी केली तर, तो बाद न होता सातत्याने धावा काढू शकतो. तो बॅकफुटवर चांगली फलंदाजी करतो. तुम्ही त्याला पुढे चेंडू टाकले पाहिजेत. त्यात काही धावा जाऊ शकतात. मात्र, त्याला बाद करण्याची संधीही इथेच मिळेल.”
चॅपेल यांनी आखूड टप्प्याच्या चेंडूंविषयी सांगताना म्हटले, “बाउन्सर हा एका आयुधाप्रमाणे वापरायचा असतो. तुम्ही तो सातत्याने टाकल्यास फलंदाजाला सहजता वाटते. न्यूझीलंडचे गोलंदाज बाउन्सरचा सातत्याने वापर करत असतात. मी असे कदापि करणार नाही. त्यामुळे जास्तीची ऊर्जा खर्च होते.”
भारताविरुद्ध स्मिथने केली आहे लाजवाब कामगिरी
स्मिथने भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याची आकडेवारी याची पुष्टी करते. स्मिथची कसोटी सरासरी भारताविरुद्ध सर्वोत्तम असलेली दिसून येते. त्याने भारताविरुद्ध ८४ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. १,४२९ धावा काढताना स्मिथने ७ शतके व ३ अर्धशतके ठोकली आहेत. भारतीय गोलंदाजांना स्मिथला बाद करण्यात अनेकदा अपयश येते. याच कारणाने, ऑस्ट्रेलिया संघ यावेळी अपेक्षा करेल की, स्मिथ भारताविरुद्धची भूतकाळाची कामगिरी तुमचा करून दाखवावी.
संबधित बातम्या:
– स्मिथच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती! कर्णधार टीम पेन म्हणाला
– अशाप्रकारे करा स्मिथला बाद, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला उपाय
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी