---Advertisement---

“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला

On: सोमवार, जुलै 19, 2021 11:03 PM
---Advertisement---

रविवारी श्रीलंका विरुद्ध भारत संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. भारताच्या या विजयात पृथ्वी शॉने 24 चेंडूंमध्ये 43 धावा करत मोलाचा वाटा उचलला. त्याच्या आक्रमक खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र, अनेकांनी शॉ चांगल्या लयीत खेळत असतानाही लवकर बाद झाला असल्याचे म्हटले. त्यावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना असे वाटते की, पृथ्वी शॉ इतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे दबावात खेळत नाही आणि त्याने फक्त एक क्षण जगायला हवा, तसेच खेळाचा आनंद घ्यावा.

संजय मांजरेकर यांच्या मतानुसार दबाव युवा खेळाडूंवर टाकू नये. त्याचबरोबर मांजरेकर पुढे म्हणाले की, भारतातील खेळाडू नेहमी शतक करण्याच्या दबावातून जात असतात. कारण चाहत्यांकडून अशाच प्रकारचा दबाव त्यांच्यावर आणला जातो. मांजरेकर म्हणाले की, पृथ्वी शॉच्या योगदानामुळे भारताला अशा स्थितीत उभे केले होते, जिथून भारतीय संघ सामना गमावू शकत नव्हता.

युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव आणू नये
मांजरेकर यांनी सोनी स्पोर्ट्स सोबत बोलताना सांगितले की, “मला आशा आहे की आपण एखाद्या युवा खेळाडूवर शतक करण्याचा दबाव टाकू नये. त्याने ज्या 43 धावा केल्या आहेत, त्यानंतर भारत विजयाच्या खूप जवळ पोहचला होता. श्रीलंकेने प्रयत्न केले तरी भारत पराभूत झाला नसता.” जेव्हा पृथ्वी शॉ बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 5.3 षटकांत 1 बाद 58 अशी होती.

पृथ्वीच्या स्ट्राइक रेटमुळे मांजरेकर खूष
मांजरेकर पुढे म्हणाले, “त्याने ज्या स्ट्राईक रेटने 40 आणि 50 धावा केल्या, त्याचा मला आनंद झाला आहे. तो बाद झाल्यानंतर असं वाटत होतं की, त्याला तसे खेळायचे नव्हते. परंतु हे होत असते. ईशान किशनने थोडी वेगळी खेळी केली, त्याने फक्त चेंडू सीमापार करणार असे लक्ष्य समोर ठेवले होते.”

मांजरेकर यांना असे वाटत होते की, मोठी शतके ठोकण्यापेक्षा सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक चांगले आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, आता या युवा खेळाडूवर शतकी खेळी करण्यासाठी दबाव आणू नये.

मांजरेकर पुढे म्हणाले की, “त्याला मोठे धावा करायची संधी मिळेल, पण मला वाटत नाही की त्याच्यावर थेट दबाव टाकला जावा की त्याने आपली सुरूवात शतकानेच करायला हवी. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जर तुम्ही सलामीला फलंदाजी करत असाल तर शतक करायची संधी मिळेल. पण विजय महत्वाचा आहे.”

शॉच्या खेळीने वेगवान सुरुवात
पृथ्वी शॉने भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताला वेगवान सुरुवात मिळाली. त्याच्या शिवाय भारताकडून शिखर धवनने 95 चेंडूत नाबाद 86 धावा, मनीष पांडेने 40 चेंडूंत 26 धावा आणि सूर्यकुमार यादव 20 चेंडूंत 31 धावा केल्या. त्याचबरोबर भारताला विजय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले ते म्हणजे ईशान किशनने. त्याने 42 चेंडूत 59 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने 263 धावांचे लक्ष्य सहज गाठले. आता एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना मंगळवारी(20 जुलै) खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक

“द्रविड जर भारतीय संघाचे प्रशिक्षक असता, तर करण जोहरने पंड्याला ‘कॉफी विथ करण’मध्ये बोलवण्याची हिंमत केलीच नसती”

वाढदिवस विशेष: विश्वचषक १९८३ स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ, युवराजलाही दिले होते प्रशिक्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---