माजी क्रिकेटपटू युवराज सिंग पुन्हा एकदा मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. युवी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या एका स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. त्यानं 2007 आणि 2011 मध्ये टीम इंडियाला विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारताच्या माजी खेळाडूंचा संघ ‘इंडिया चॅम्पियन्स’ ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स’मध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) द्वारे मान्यताप्राप्त या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू सहभागी होणार आहेत.
युवराज सिंग व्यतिरिक्त ‘इंडिया चॅम्पियन्स’ संघात हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू आणि युसूफ पठाण या दिग्गजांचा समावेश आहे. भारतीय संघ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम आणि नॉर्थम्प्टनशायर येथे सामने खेळणार आहे. सुरेश रैना, माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग आणि माजी लेगस्पिनर राहुल शर्मा शुक्रवारी (31 मे) ‘इंडिया चॅम्पियन्स’च्या जर्सीच्या अनावरणप्रसंगी संघमालकांसह उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश रैनानं सांगितलं की, “तो वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी उत्साहित आहे.” तो म्हणाला, “युवराज आणि हरभजनसोबत आम्ही पाकिस्ताविरुद्ध अनेक सामने खेळलो. जेव्हा तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करता तेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करता. आम्ही इंग्लंडमध्ये पाकिस्तानचा सामना करण्यासाठी उत्सुक आहोत.”
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स’साठी ‘इंडिया चॅम्पियन्स’ संघ – युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय कुमार, धवल कुलकर्णी
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वांचा लाडका ‘डीके’ झाला 39 वर्षांचा! धोनीच्या सावलीत झाकोळली गेली अख्खी क्रिकेट कारकीर्द