भारतीय संघाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या इंग्लिश भूमीवर काउंटी क्रिकेट खेळतोय. येथे तो नॉर्थम्प्टनशायर संघाचा भाग आहे. डर्बीशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. संघासाठी त्याने पहिल्या डावात 16.3 षटके टाकून 45 धावा देऊन 5 बळी मिळवले. त्याची जादू दुसऱ्या डावातही पाहायला मिळाली. दुसऱ्या डावातही त्याने चार बळी टिपले. त्याने सामन्यात 9 विकेट घेतल्या. चहलच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नॉर्थम्प्टनशायर संघाने डर्बीशायरविरुद्ध 133 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
चहलने डर्बीशायरविरुद्ध 9 विकेट घेत विशेष कामगिरी केली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणाऱ्या खास गोलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे. चहलने आतापर्यंत एकूण 38 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 60 डावांमध्ये 33.00 च्या सरासरीने 106 बळी मिळवले आहेत. या काळात त्याने 4 वेळा 4 बळी आणि 3 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 44 धावांच्या मोबदल्यात 6 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
चहलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 72 वनडे आणि 80 टी20 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने वनडे सामन्यांच्या 69 डावात 27.13 च्या सरासरीने 121 धावा केल्या आहेत. तर, टी20 च्या 79 डावात 25.09 च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याला भारतासाठी कधीही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
असे असले तरी, चहल हा मागील काही काळापासून भारतीय संघासाठी खेळलेला नाही. भारतीय संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक संघात देखील त्याला स्थान मिळाले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर देखील त्याचा विचार केला गेला नव्हता.
हेही वाचा –
आधी मार खाल्ला, मग वचपा काढला; दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान रियान आणि अर्शदीपमध्ये खडाजंगी
INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!