इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या १८३ धावांचा पाठलाग करत असताना, केएल राहुलने ८४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यावर भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असलेल्या झहीर खानने, केएल राहुलची तुलना भारताचा माजी कर्णधार असलेल्या राहुल द्रविडशी केली आहे. द्रविड आणि राहुल यांच्या नावासोबतच इतर गोष्टीतही समानता असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
राहुलने भारतीय संघात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तो विराट कोहलीसाठी एका प्रकारे ‘गो-टू मॅन’ आहे, जो कोठेही संघात हव्या त्यावेळी मोलाची भूमिका बजावू शकतो. जसे की, राहुल कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तसेच गरजेच्या वेळी यष्टिरक्षक म्हणून देखील तो भूमिका बजावतो. हीच समानता द्रविड आणि केएल राहुल यांच्यात आहे.
क्रीकबझशी याबद्दल बोलताना झहीर म्हणाला, “द्रविडने भारतीय संघासाठी यष्टिरक्षण केले होते. तसेच केएल राहुलसुद्धा गरजेच्या वेळी संघात यष्टिरक्षक म्हणून खेळतो. ही समानता एकतर बेंगलोरशी संबंधित असू शकते, नाहीतर त्यांच्या नावाशी. द्रविडने भारतीय संघाकडून खेळताना इतक्या गोष्टी केल्या आहेत, ज्या एका शब्दात सांगणे शक्य नाही. परंतु केएल राहुलसुद्धा द्रविड सारखाच खेळाडू आहे यात काहीच शंका नाही.”
केएल राहुलने २०१९ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यंदाच्या दौऱ्यात शुभमन गिलला दुखापतीमुळे मालिकेच्या सुरुवातीलाच आपले नाव मागे घ्यावे लागले होते. त्यांनतर मयंक अगरवाल देखील दुखापतग्रस्त झाला. पृथ्वी शॉ नुकताच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे केएल राहुलला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. तसेच राहुलने संधी मिळाल्यानंतर उत्कृष्ट खेळी देखील केली.
झाहिरच्या मते, “ही मालिका जशी जशी पुढे जात राहील तसे तसे केएल राहुल स्वतःला सिद्ध करू शकतो. पूर्ण मालिकेत केएल राहुल आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. ज्या प्रकारे त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याच्या खेळण्याची शैली, त्याच्या शॉटची निवड अत्यंत उत्कृष्ट आहे. तसेच हे केएल राहुलसाठी हे कौतुकास्पद आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत
–नॉटिंघम स्टेडियममध्ये दिसला अगदी रिषभसारखा व्यक्ती; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर पंतचा जुळा भाऊ’
–बुमराहच्या षटकाराने सर्वांनाच घातली भुरळ, सचिनही झालाय प्रभावित; तुम्ही तो सिक्स पाहिलाय ना?