आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील 17व्या सामन्यात सोमवारी (दि. 26 जून) झिम्बाब्वे विरुद्ध युनायटेड स्टेट्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात यूएसए संघाला पराभवाचा धक्का बसला. सामन्यात झिम्बाब्वेने 304 धावांनी विजय मिळवला. या विजयासह झिम्बाब्वे संघाने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा झिम्बाब्वे दुसराच संघ बनला.
झिम्बाब्वे संघाचा विक्रम
खरं तर, वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांनी विजय मिळवणारा झिम्बाब्वे (Zimbabwe) हा दुसरा संघ बनला आहे. वनडेत सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. भारताने 15 जानेवारी, 2023 रोजी श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे 317 धावांनी मोठा विजय मिळवला होता. हा विक्रम मोडण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 14 धावा कमी पडल्या.
या मोठ्या विजयामुळे झिम्बाब्वे संघाकडून अनेक विक्रम रचले गेले. झिम्बाब्वे संघाने वनडे कारकीर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या बनवली. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या झिम्बाब्वे संघाने 50 षटकात 6 विकेट्स गमावत 408 धावा केल्या होत्या. या धावा करण्यात कर्णधार सीन विलियम्स (Sean Williams) याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याला शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
सीन विलियम्सचा धमाका
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेलल्या विलियम्सने 101 चेंडूंचा सामना करताना 5 षटकार आणि 21 चौकारांच्या मदतीने 174 धावांचा पाऊस पाडला. या धावा त्याने 172.28च्या स्ट्राईक रेटने चोपल्या. ही झिम्बाब्वेच्या एका फलंदाजाने केलेली तिसरा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याने आपले शतक अवघ्या 64 चेंडूत पूर्ण केले होते. ही सिकंदर रझा (Sikander Raza) याच्यानंतरची झिम्बाब्वेसाठी दुसरी सर्वात वेगवान शतक ठरले. रझाने याच स्पर्धेत विलियम्सचा विक्रम मोडत 54 चेंडूत शतक ठोकले होते. रझाने या सामन्यात 27 चेंडूत 48 धावांची खेळी केली, तर रायन बर्ल यानेही 16 चेंडूत 47 धावांची विस्फोटक खेळी केली.
झिम्बाब्वेच्या या आव्हानाचा पाठलाग करताना यूएसए संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. सहा फलंदाज अवघ्या 45 धावांच्या आत तंबूत परतले. यानंतर संपूर्ण संघ 104 धावांवरच गारद झाला. रिचर्ड नगारवा याने 8 षटकात 25 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सिकंदर रझा याने 5 षटकात 15 धावा खर्चून 2 विकेट्स नावावर केल्या. याव्यतिरिक्त ब्रॅड इव्हान्स, ल्यूक जॉन्गवे आणि रायन बर्ल यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (zimbabwe records second highest margin victory in odi cricket against usa)
महत्वाच्या बातम्या-
वडिलांच्या वाढदिवशी आठवण काढत कृणाल पंड्या भावूक, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
‘तुझ्याकडे पैसा जास्त आणि माझ्याकडे…’, ब्रावोने पोलार्डला पुन्हा केले ट्रोल, पाहा व्हिडिओ