भारताची झिम्बाब्वे दौऱ्याची सुरूवात उत्तम झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने झिम्बाब्वेविरुद्ध सलग दोन सामने जिंकत तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना आज (रविवार, 26 जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता अय्यरने वर्तवली आहे.
दुसऱ्या सामन्यात भारताने 90 धावांनी मोठा विजय मिळवला, मात्र या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा प्रिन्स यादव दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
हरारेमध्ये शनिवारी (25 जुलै) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रिन्स आपल्या दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकत होता. त्याक्षणी त्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. या दुखापतीआधी त्याने 10 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत, मात्र अय्यरच्या विधानावरून तो तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
दुसऱ्या सामन्यानंतर अय्यर म्हणाला, “दुर्दैवाने आमचा एक खेळाडू (प्रिन्स यादव) जखमी आहे, त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात संघात एक-दोन बदल होऊ शकतात.”
अय्यरने पुढे भारतीय फलंदाजांचे कौतुक करताना म्हटले, “मला वाटते की ईशान आणि तिलक ज्याप्रकारे खेळले ते उत्कृष्ट होते. त्यांनी खेळलेले काही फटके खूपच सुंदर होते आणि ते डोळ्यांना आनंद देणारे होते. सुरुवातीला मला वाटले होते की 180 ते 200 च्या दरम्यानची धावसंख्या एक सरासरी धावसंख्या असेल, पण आम्ही 220 धावा केल्या, ज्या संघासाठी बोनस ठरल्या. मग गोलंदाजीमध्ये, नेहमीप्रमाणे गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि दिशा साधत झिम्बाब्वेला 130 धावांवर गुंडाळले.”
अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. आता तिसरा सामना जिंकून त्याचा शेवट विजयाने करत यजमान झिम्बाब्वे संघाला व्हाईटवॉश देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. (ZIMvsIND 3rd t20 Prince Yadav can be left out Captain Shreyas Iyer shares a major update.)






