भारत विरुद्ध इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवरील पहिल्या सामन्यापासून सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाकडून अष्टपैलू कृणाल पंड्याने आपले वनडे पदार्पण केले. यावेळी कृणाल आपली वनडे कॅप स्वीकारताना कमालीचा भावूक झाला होता.
कृणालचाच लहान भाऊ हार्दिक पंड्याच्या हातून आपली कॅप स्वीकारताना त्याला जानेवारी महिन्यात निधन झालेल्या आपल्या वडिलांची आठवण आली. या क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील शेअर केला. हे पाहून भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने कृणाल पंड्याला एक खास संदेश दिला आहे.
वसीम जाफरच्या कृणालला शुभेच्छा
कृणाल पंड्या यापूर्वी भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये खेळला आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्याला वनडे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कृणालला वसीम जाफरने ट्विट करत शुभेच्छा दिल्या. तसेच भावूक झालेल्या कृणालला पाहून जाफरने ‘बहुतेक डोळ्यात काहीतरी गेले असावे’ असे कॅप्शन देखील लिहिले आहे.
कृणालचे दमदार पदार्पण
दरम्यान, आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळणाऱ्या कृणाल पंड्याने आत्तापर्यंत झालेल्या खेळात दमदार कामगिरी केली आहे. भारताकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कृणालने पहिल्या चेंडूपासूनच आत्मविश्वासाने फलंदाजी केली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकवण्याची किमया केली. याच जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१७ धावा उभारल्या.
महत्वाच्या बातम्या:
जिगरबाज रोहित! हातातून रक्त येत असतानाही नाही सोडले मैदान, पाहा व्हिडिओ
Video: पंड्या कुटुंबासाठी भावूक क्षण; हार्दिककडून वनडे कॅप स्वीकारताना कृणालला आली वडिलांची आठवण
अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी






