चष्मा घालून क्रिकेट खेळणे ही सोपी गोष्ट नाही. अनेकदा यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. परंतु असे असतानाही अनेक क्रिकेटपटू आजपर्यंत चष्मा खालून खेळले आहेत. चष्मा घालण्यामागे केवळ डोळ्यांचा कमकुवतपणा मुद्दा नव्हता तर सामन्यात अनेक क्रिकेटपटूंनी चेंडू नीट पाहता यावा या दृष्टीनेही चष्मा घातला होता.
मैदानात असताना फलंदाजच नव्हे तर गोलंदाजांनी देखील चष्मा वापरला आहे. चष्मा परिधान केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीतील अलीकडील नाव इंग्लंडचा गोलंदाज जॅक लीच. बेन स्टोक्सनेही त्याला पुन्हा पुन्हा चष्मा साफ केल्याबद्दल चिडवले होते.
या लेखात, चष्मा परिधान करून खेळणार्या १० क्रिकेटपटूंची माहिती दिली आहे.
१. नरेंद्र हिरवाणी (Narendra Hirwani)
नरेंद्र हिरवाणी हे वेस्ट इंडीज विरुद्ध मद्रासमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीबद्दल सर्वांच्या लक्षात आहेत. त्यांनी सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना गुगलीने क्लीन बोल्ड केले होते. त्यांनी कसोटी सामन्यात झटपट प्रसिद्धी मिळविली.
ते चष्मा आणि हेड बँड परिधान करून खेळायचे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ते घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ठरले. परंतु परकीय देशात अपयशी ठरले, म्हणूनच त्यांना संघातून वगळण्यात आले. पुढे अनिल कुंबळेने त्यांची जागा घेतली.
हिरवानी यांनी भारतासाठी एकूण १७ कसोटी आणि १८ वनडे सामने खेळले. राष्ट्रीय संघातून वगळले गेले असले तरी, त्यांना देशांर्गत क्रिकेटमध्ये खेळणे सुरु ठेवले. त्यांनी २१ वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळताना प्रथम श्रेणी कारकिर्दीत ७३२ बळी टिपले.
२. माईक स्मिथ (Mike Smith)
इंग्लंडचा माजी कर्णधार माईक स्मिथ एक चांगले खेळाडू होते. ते इंग्लंडचे यशस्वी कर्णधारही होते. त्यांनी ५० कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. ते चष्मा परिधान करुन खेळायचे.
एकंदरीत त्यांनी ६३७ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आणि ३९८३२ धावा केल्या आहेत. ते १९७५ मध्ये निवृत्त झाले आणि १९९१-१९९६ दरम्यान ते आयसीसीचे मॅच रेफरी बनले. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी इंग्लंडच्या रग्बी संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे.
३. डेव्हिड स्टील (David Steele)
इंग्लंडचे माजी फलंदाज डेव्हिड स्टील हे काउन्टी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याचा विचार करत असतानाच त्यांना राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी १९७५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी मालिका खेळली.
त्यांनी ८ कसोटी सामन्यांसह ५०० प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आणि २२३४६ धावा केल्या ज्यामध्ये ३० शतके आणि ११७ अर्धशतकांचा समावेश आहे. १९७६ मध्ये त्यांना “विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ते देखील चष्मा घालून खेळायचे.
४. दिलीप दोशी (Dilip Doshi)
वयाच्या ३० व्या वर्षी चष्मा घालून दिलीप दोशी यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी १०० कसोटी विकेट्स मिळवल्या. त्यावेळी वयाचा काही फरक पडला नाही. त्यांनी ३३ कसोटी सामने आणि १५ वनडे सामने खेळले असून अनुक्रमे ११४ आणि २२ विकेट्स घेतल्या आहेत.
राष्ट्रीय संघातून खेळण्यासाठी त्यांनी बराच काळ वाट पहिली. शेवटी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्याच मैदानावर पदार्पण केले. या मालिकेनंतर त्यांनी संघात आपले स्थान कायम केले. १९७९-१९८३ दरम्यान ते भारताकडून खेळले.
५. डॅनियल विट्टोरी (Daniel Vettori)
न्यूझीलंडचा माजी फिरकी गोलंदाज डॅनियल विट्टोरी हा १९९७-२०१५ या काळात न्यूझीलंड संघाचा मुख्य आधारस्तंभ होता. तो फिरकी गोलंदाजीचा प्रमुख प्रमुख होता. तसेच न्यूझीलंडचा धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जात होता. पण त्याच्या चष्मा-परिधान केलेल्या लुकमुळे तो किती घातक असू शकतो हे कधीही दिसून आले नाही.
तो कसोटी इतिहासातील आठवा खेळाडू आहे, ज्याने ३०० बळी घेतले आहेत आणि ३००० धावा केल्या आहेत. व्हेटोरीने ११३ कसोटी सामने खेळला. त्याने न्यूझीलंडला २०१५ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
६. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस चष्मा परिधान करताना दिसला. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे गोलंदाजांवर आपला दरारा निर्माण केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच, वनडे स्वरूपात दुहेरी शतक झळकावणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला होता.
अनेक फलंदाजानी सेहवाग सारखी आक्रमक फलंदाजीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला परंतु अनेकांमा यात यश मिळाले नाही. त्याने ८२.२३ च्या स्ट्राइक रेटने ८५८६ कसोटी धावा आणि २३ शतके केली आहेत. कसोटी व्यतिरिक्त त्याने वनडे सामन्यातही आपला दर्जा दाखविला. २०११ च्या विश्वचषकात भारताचा तो महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने २०१५ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
७. झहीर अब्बास (Zaheer Abbas)
झहीर अब्बास यांनी १९७०-१९८० च्या दशकात यांनी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या धावांच्या भुकेमुळे, त्याचे नाव एशियन ब्रॅडमन असे ठेवले गेले होते.त्यांनी ७८ कसोटी सामन्यांमध्ये ५०६२ धावा केल्या तर ६२ वनडे सामन्यात त्यांनी २५७२ धावा केल्या.
१९८५ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नंतर एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये मॅच रेफरी म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्षही बनले. ते देखील चष्मा घालून क्रिकेट खेळायचे.
८. अनिल कुंबळे (Anil Kumble)
भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेदेखील कारकीर्दीच्या सुरुवातीला चष्मा लावायचा. आपल्या गोलंदाजीमुळे तो भारतासाठी “मॅच विनिंग” खेळाडू म्हणून उदयास आला. याबरोबरच तो एक यशस्वी कर्णधारही होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखविली. एका डावात त्याने १० बळी मिळवण्याचा पराक्रमही केला.
त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ६१९ बळी घेतले. २७१ वनडे सामन्यात त्याने ३३७ बळी टिपले आहेत. कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो जगातील तिसर्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. २००८ मध्ये तो निवृत्त झाला.
९. ज्योफ बॉयकॉट (Geoff Boycott)
१९६० च्या दशकात कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात इंग्लंडचे फलंदाज ज्योफ बॉयकॉट, कॉन्टॅक्ट लेन्स बसविण्यापूर्वी चष्मा वापरून फलंदाजी करायचे.
त्यांनी प्रथम श्रेणी मध्ये ४८,४२६ धावा केल्या आणि त्यांना इंग्लंडचे नेतृत्व करण्याचाही मान मिळाला होता. निवृत्तीनंतर बॉयकॉट हे कमेंट्री बॉक्समध्ये समालोचन करताना दिसले.
१०. क्लाइव्ह लॉयड (Clive Lloyd)
क्लाईव्ह लॉयडच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज संघ ७०-८० च्या दशकात यशाच्या शिखरावर होता. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांच्या डोळ्याला दुखापत झाल्यावर लॉयडला चष्मा घालण्यास भाग पडले. परंतु, नंतरच्या कारकीर्दीत त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स लावून घेतल्या.
एक उंच, शक्तिशाली, मधल्या फळीतील फलंदाज आणि अधूनमधून मध्यमगती गोलंदाजी करणारे खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी तीन विश्वचषकात वेस्ट इंडीजचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले . त्यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ मध्ये दोन विश्वचषक जिंकले. ते यशस्वी कसोटी कर्णधारही होते.
त्यांनी ११० कसोटी आणि ८७ वनडे सामने खेळून ९००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
वाचनीय लेख –
अशा १३ घटना जेव्हा शिवसेनेने केला भारत-पाकिस्तान सामन्यावेळी राडा
दारु पिणे किती महागात पडू शकते, याची ५ क्रिकेटमधील उदाहरणे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले ‘पाटील’ आडनावाचे ३ खेळाडू