आयपीएल २०२० मधील चौदावा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना सनरायझर्स संघाने अवघ्या ७ धावांनी जिंकला. सनरायझर्स संघाचा हा या हंगामातील दुसरा विजय होता. असे असले तरी चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने एक कारनामा केला.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या होत्या. हैदराबादच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाची सुरुवात फारच वाईट झाली. चेन्नईचे पहिले ४ विकेट्स ५० धावांच्या आतच पडले. त्यानंतर रवींद्र जडेजाने चमकदार कामगिरी करत अर्धशतकी खेळी खरी, पण तोदेखील पुढे बाद झाला. यादरम्यान १७ व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर फलंदाजीला करन आला. यावेळी करनने आपल्या पहिल्याच चेंडूवर धुंव्वादार षटकार ठोकला. त्याने ठोकलेला हा षटकार आयपीएल इतिहासातील चेन्नई संघाचा १००० वा षटकार होता. याबरोबरच चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाब संघाची बरोबरी केली आहे.
यापूर्वी आयपीएल इतिहासात १००० षटकार पूर्ण करण्याचा कारनामा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांनी केला आहे.
यामध्ये बेंगलोर संघ अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ११४७ षटकार ठोकले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई संघ असून त्यांनी ११३४ षटकार मारले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर पंजाब संघ आहे. त्यांनी १००२ षटकार ठोकले आहेत.
आयपीएल इतिहासात १००० षटकार पूर्ण करणारे संघ
११४७ षटकार- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
११३४ षटकार- मुंबई इंडियन्स
१००२ षटकार- किंग्स इलेव्हन पंजाब
१००२ षटकार- चेन्नई सुपर किंग्स