मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रलियाकडून एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी सलामीला फलंदाजीला येताना तुफानी फटकेबाजी केली. या दोघींनीही सलामीला ११.४ षटकातच ११५ धावांची भागीदारी रचली. पण अखेर राधा यादवने हेलीला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.
राधाने टाकलेल्या १२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हिलीने लाँग ऑनच्या दिशेला मोठा फटका मारला. मात्र वेदा कृष्णमुर्तीने तिचा शानदार झेल घेतला. त्यामुळे हिली ३९ चेंडूत ७५ धावा करुन बाद झाली. या तुफानी अर्धशतकी खेळीत तिने ७ चौकार आणि ५ षटकार मारले.
ती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मेग लेनिंग फलंदाजीसाठी आली आहे. ऑस्ट्रेलियाने १२ षटकात १ बाद ११७ धावा केल्या आहेत.






