कसोटी क्रिकेटमध्ये शतक, द्विशतक, त्रिशतक करणे ही फलंदाजांसाठी मोठी गोष्ट असते. तसेच, तो सामना खेळाडूसाठी जीवनातील अविस्मरणीय ठरतो. कोणत्याही फलंदाजासाठी ९९, १९९, किंवा २९९ धावांवर बाद होणे हे दुर्भाग्यशाली समजले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी फक्त एकदाच असे घडले आहे, की फलंदाज वैयक्तिक २९९ धावांवर बाद झाला आहे.
न्यूझीलंडचे माजी फलंदाज मार्टिन क्रो १९९१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २९९ धावांवर बाद झाले होते. विशेष म्हणजे मार्टिन क्रो यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या कायम हीच राहिली.
दुसऱ्या बाजूला जगातील आजपर्यंतचे महान क्रिकेटर समजले जाणारे सर डाॅन ब्रॅडमन हे २९९ धावांवर नाबाद राहिले होते.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज १० वेळा १९९ आणि ८६ वेळा ९९ च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाले आहेत.
भारतीय खेळाडूंचा विचार केला, तर फलंदाज १० वेळा ९९ च्या धावसंख्येवर बाद झाले आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली दोन वेळा ९९ धावांवर बाद झाला आहे. पंकज रॉय, एम एल जयसिम्हा, अजित वाडेकर, रुसी सुरती, नवज्योतसिंग सिद्धू, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि मुरली विजय हे खेळाडू प्रत्येकी एक वेळा ९९ धावसंख्येवर बाद झाले आहेत.
याव्यतिरिक्त दोन भारतीय फलंदाज १९९ धावसंख्येवर बाद झाले आहेत. या लेखात त्या दोन फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये १९९ च्या धावसंख्येवर बाद होणारे भारतीय फलंदाज- 2 batsman in India who got out on 199 in Test Cricket
१. मोहम्मद अझरुद्दीन (१९९ वि श्रीलंका, कानपूर १९८६)
श्रीलंकेविरुद्ध १९८६ साली कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) १९९ धावसंख्येवर बाद झाले होते. अझरुद्दीन यांच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती.
श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुनील गावसकर, कपिल देव, आणि अझरुद्दीन यांच्या दीडशतकी खेळीच्या मदतीने ७ बाद ६७६ धावांचा डोंगर उभा केला. कसोटीत २२ शतके ठोकणारे अझरुद्दीन यांना एकदाही द्विशतक करता आले नाही.
२. केएल राहुल (१९९ वि इंग्लंड, चेन्नई २०१६)
भारतीय संघातील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल (KL Rahul) २०१६ साली चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात १९९ धावांवर बाद झाला होता. याच कसोटीत करूण नायरने नाबाद ३०३ धावांची जबरदस्त खेळी केली होती. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ४७७ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत भारताने त्या सामन्यात ७ बाद ७५९ धावा करत डाव घोषित केला होता. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २०७ धावांवर सर्वबाद झाला होता.
अशाप्रकारे भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि ७५ धावांनी पराभूत केले होते.