मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली भारतीय संघात एक महान खेळाडू म्हणून नावाला आला. अनेकदा तर सचिन आणि विराटची तुलनाही झाली आहे. तसेच सचिनचे अनेक विक्रम मोडण्याची क्षमता विराटमध्ये असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.
सचिन आणि विराट या दोघांनीही क्रिकेटमध्ये आपल्या बॅटची चमक दाखविली आहे. सध्या विराट कोहली हा एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. सचिन हा आपल्या काळात सर्व गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला होता.
फलंदाजीव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरने बऱ्याच वेळा गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. वनडे सामन्यात दोनदा पाच विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० हून अधिक बळी घेतले आहेत.
विराट कोहलीने तितकी गोलंदाजी केली नाही. पण जेवढी गोलंदाजी केली त्यात त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ विकेट्स घेतल्या आहेत.
सचिन आणि विराटच्या गोलंदाजीत अशी एक समानता आहे की या दोघांच्या गोलंदाजीवर तीन फलंदाज बाद झाले आहेत. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनी बाद केलेले तीन फलंदाज कोण ते या लेखात पाहू.
फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी बाद केलेले फलंदाज…
१. केविन पीटरसन (Kevin Pietersen)
२००७ मध्ये सचिन तेंडुलकरने तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केविन पीटरसनला राहुल द्रविड करवी झेल बाद केले. ड्राईव्ह करताना पीटरसनच्या बॅटची कडा घेऊन चेंडू पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या द्रविडच्या हातात गेला होता.
२०११ मध्ये टी२० सामन्यात विराट कोहलीने पीटरसनला बाद केले. मँचेस्टरमध्ये कोहलीने पीटरसनला धोनीच्या हातून यष्टिचीत केले. हा विराटचा टी२० मध्ये टाकलेला पहिलाच चेंडू होता आणि त्यावर पहिला बळी टिपला. मजेशीर गोष्ट म्हणजे तो चेंडू वाईड होता.
२. मोहम्मद हफीझ (Mohammad Hafeez)
कोची वनडेमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद हफीझला सचिन तेंडुलकरने बाद केले होते. सचिनच्या गोलंदाजीवर आशिष नेहराने हाफिजचा झेल टिपला होता. या सामन्यात सचिनने ५ विकेट्स घेतल्या होत्या.
२०१२ टी२० विश्वचषकात कोलंबोमध्ये विराट कोहलीने हाफिजला त्रिफळाचीत केले होते.
३. ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum)
२००९ मधील भारताच्या न्यूझीलंड दौर्यामध्ये वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात सचिन तेंडुलकरने ब्रेंडन मॅक्यूलमला राहुल द्रविडच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
२०१४ मध्ये न्यूझीलंडच्या दौर्यावर विराट कोहलीने ब्रेंडन मॅक्यूलमला पाचव्या वनडे सामन्यात बाद केले होते. मॅक्यूलमचा २३ धावांवर कोहलीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने झेल टिपला आणि त्याला पॅव्हिलियनचा रास्ता दाखविला होता. पण या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
वाचनीय लेख –
शेवटी सचिन वैतागून म्हणाला, दादा टॉसला जा!
खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत भारतातील
थोडे नाही तर तब्बल ७ वर्ष सचिन होता टीम इंडियातील सर्वात छोटा सदस्य