क्रिकेट इतिहासाताची पाने उलगडून पाहिली तर, पारंपारिक क्रिकेटपासून ते मॉडर्न क्रिकेटपर्यंतचा शानदार इतिहास आपाल्याला पाहायला मिळतो. वेळेनुसार क्रिकेटच्या प्रकारात, क्रिकेटपटूंच्या शैलीत अनेक बदल झाले आहेत. त्या सर्व बदलांपैकी एक शानदार आणि अनोखा बदल म्हणजे, नेहमी गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी दाखवणाऱ्या गोलंदाजांना फलंदाजीत कमाल करताना पाहणे.
सध्याच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजही फलंदाजी करताना मोठ-मोठे शॉट्स मारत मोठ्या आकडी धावा करताना दिसतात. परंतु, पुर्वी असे नव्हते. पुर्वी अधिकतर गोलंदाजांचा केवळ गोलंदाजीमध्ये हातखंडा होता. जर त्यांना गरजेनुसार बॅट घेऊन मैदानावर उतरावे लागले, तर ते लवकरच बाद होत असत. त्यामुळे कधी-कधी शेवटी कमी धावा करायच्या असतानाही संघाला सामना गमवावा लागत असे.
आजवर अनेकदा असे झाले की, एखादा गोलंदाज जो नेहमी खालच्या फळीत फलंदाजी करतो, त्याला थेट वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अशावेळी त्या गोलंदाजांनी सर्वांना अवाक् करणारे फलंदाजी प्रदर्शनही केले आहे. या लेखात त्याच ५ घटनांचा आढावा घेण्यात आला आहे.
गोलंदाज वरच्या फळीत फलंदाजीसाठी उतरले असतानाचे पाच किस्से (5 Bowlers Who Did Opening In Test Match) –
५. इकबाल सिद्दीकी –
महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज इकबाल सिद्दीकी याने भारतीय संघाकडून केवळ १ कसोटी सामना खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये या गोलंदाजाची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९० सामने खेळत ३१५ विकेट्स चटकावल्या आहेत. तर, फलंदाजी करतानाही त्याने १३४३ धावा केल्या आहेत.
सिद्दीकीला डिसेंबर २००१ मध्ये भारताकडून मोहाली येथील इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. तसं तर, मोहालीमधील क्रिकेट मैदान वेगवान गोलंदाजांसाठी उत्तम असल्याचे समजले जाते. पण, त्या सामन्यात ते मैदान फिरकीपटूंसाठी लकी ठरलं होतं. तरीही वेगवान गोलंदाज सिद्दीकीने पूर्ण सामन्यात १९ षटके टाकत केवळ १ विकेट मिळावली होती.
पण, सिद्दीकीने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्या डावात १०व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सिद्दीकीने संघाच्या धावसंख्येमध्ये २४ धावा जोडल्या होत्या आणि संघाचा पूर्ण धावसंख्या ४६९ इतकी झाली होती. इंग्लंडला पहिल्या डावात केवळ २३८ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे भारत पहिल्या डावात २३१ धावांनी आघाडीवर होता.
इंग्लंडने त्यांच्या दूसऱ्या डावात भारताच्या २३५ धावा केल्या त्यामुळे त्यांचा संघ केवळ ४ धावा ज्यादाच्या करु शकला. त्यामुळे भारताला दूसऱ्या डावात विजयासाठी केवळ ५ धावा करायच्या होत्या. यावेळी भारताकडून दीप दासगुप्तासोबत सिद्दीकीला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले होते. सिद्दीकीने फलंदाजी करताना २ चेंडूत एक चौकार मारत सहज ५ धावा करत संघाला १० विकेट्सने तो सामना जिंकून दिला होता.
४. जॅक लीच –
इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने २०१८मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून १० कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ८३ धावा देत ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीसह एकूण ३४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. तर, १८ डावात फलंदाजी करताना त्याने २२० धावा आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत.
उजव्या हाताचा हा गोलंदाज १६ वेळा १०व्या किंवा ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. पण, दोनवेळा त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. २०१८मध्ये पल्लेकल्ले येथील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात लीचने पहिल्यांदा समालीला फलंदाजी केली होती. त्यावेळी इंग्लंडला संध्याकाळी केवळ एक षटक खेळायचे होते आणि दिवसाचा डाव संपणार होता. त्यामुळे लीचला प्रथम क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. त्यावेळी तो केवळ एका धावेवर बाद झाला होता.
तर, २०१९मध्ये लॉर्ड्स येथील आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दूसऱ्यांदा लीचला सलामीला फलंदाजीसाठी उतरण्याची संधी मिळाली होती. यावेळी, लीचने संधीचे सोने करत ९२ धावांची दमदार खेळी केली होती. त्याच्या अफलातून खेळीमुळे इंग्लंडने तो सामना १४३ धावांनी जिंकला होता. या लीचच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावा आहेत. याव्यतिरिक्त त्याने कसोटीत एक अर्धशतकही ठोकले आहे.
३. मॉर्ने मॉर्केल –
दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्कलने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी केली आहे. कसोटीत त्याने आतापर्यंत ८६ सामने खेळत ३०९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, कसोटीत फलंदाजी करताना त्याने ९४४ धावाही आपल्या नावावर केल्या आहेत. वनडे आणि टी२० क्रिकेटमधील त्याची आकडेवारीही उल्लेखनीय आहे.
२००९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्यांदा सलामीला फलंदाजी करण्याचा अनुभव घेतला होता. या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकाचा कर्णधार आणि नियमित सलामी फलंदाज ग्रीम स्मिथ ३० धावांवर रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे स्मिथने मॉर्कलला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले होते. पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे मॉर्कल जास्त वेळ टिकू शकला नाही. तो केवळ २ चेंडूत शून्य धावांवर बाद झाला.
२. डॅनी मॉरिसन आणि मायकल स्नेडन –
कसोटी क्रिकेटमध्ये खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला मधल्या फळीत किंवा वरच्या फळीत खेळतानाचे आपण पाहिले आहे. पण, नेहमी १०व्या किंवा ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दोन खेळाडूंना एकसोबत सलामी जोडी म्हणून मैदानावर उतरल्याचे खूप कमी पाहायला मिळते. ही अनोखी संधी न्यूझीलंडच्या डॅनी मॉरिसन आणि मायकल स्नेडनला मिळाली होती.
१९९० मध्ये क्राइस्टचर्च येथील भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात हा अनोखा विक्रम घडला होता. झाले असे की, या सामन्यातील दूसऱ्या डावात न्यूझीलंडला जिंकण्यासाठी केवळ २ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे संघाने मॉरिसन आणि मायकल या गोलंदाजांच्या जोडीला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्या दोघांनीही प्रत्येकी १-१ धावा करत संघाला सामना जिंकून दिला होता. त्यामुळे खालच्या फळीतील खेळाडूंची जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरल्याचे उदाहरण त्यांनी जगासमोर मांडले.
१. बिल ओरेली आणि चक फ्लीटवुड-स्मिथ –
१९३७ साली मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांचा पहिला डाव ९ बाद २०० धावांवर घोषित केला होता. त्यांनतर इंग्लंड संघ पहिल्या डावात केवळ ९ बाद केवळ ७६ धावा करु शकला होता.
त्यानंतर सर ब्रॅडमन यांनी त्यांच्या दूसऱ्या डावात खालच्या फळीतील बिल ओरेली आणि चक फ्लीटवुड-स्मिथ यांना सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. नेहमी १०व्या किंवा ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारे हे खेळाडू सलामीला उतरल्यानंतर एकही धाव न करता रिकाम्या हाती परत गेले होते. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाने तो सामना ३६५ धावांनी जिंकला होता.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलचे ५ परदेशी स्टार क्रिकेटर, जे सध्या खेळत आहेत कॅरेबियन प्रीमियर लीग
देशाकडून एकही सामना न खेळण्याची संधी मिळालेले ५ महान क्रिकेटर
५ क्रिकेटर ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर पुन्हा केले होते कमबॅक, परंतू झाले सुपर फ्लॉप
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?
मुंबई- चेन्नईपुर्वीच आयपीएलचे हे ३ संघ दुबईत दाखल, ६ दिवस होणार क्वारंटाईन