१५ ऑगस्ट २०२० हा तो दिवस आहे, ज्यादिवशी भारतीय संघातील दोन दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन निवृत्ती जाहीर करत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वांना आश्चर्याचा झटका दिला होता की लगेच रैनानेही धोनीपाठोपाठ त्याच्या निवृत्तीची घोषणा केली.
क्रिकेटच्या इतिहासात कदाचित असे पहिल्यांदाच घडले असेल की, एका संघातील दोन दिग्गजांनी ४० मिनिटांच्या अंतराने त्यांची निवृत्ती जाहीर केली. जरी धोनी आणि रैनाला चाहते इथून पुढे निळ्या जर्सीत पाहू शकणार नसले, तरी हे दोघेही आयपीएलमध्ये सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत खेळताना दिसतील.
धोनी-रैनाच्या वेळेला किंवा त्यांच्यापुर्वी भारतीय संघात पदार्पण केलेले काही सिनियर खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले नाहीत. अनेक वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर असणाऱ्या या खेळाडूंना त्यांच्या पुनरागमनाची प्रतिक्षा असणार. पण, आता धोनी-रैनासारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. तर, काही भारतीय दिग्गजही लवकरच त्यांचे मतपरिवर्तन करत निवृत्तीचा विचार करु शकतात.
या लेखात, भारतीय संघातील त्या ५ दिग्गजांविषयी आपण पाहणार आहोत, जे लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांची निवृत्ती जाहीर करु शकतात.
धोनी-रैनानंतर निवृत्ती घेऊ शकणारे ५ भारतीय दिग्गज (5 Indian Players Could Retire After Dhoni And Raina)-
५. हरभजन सिंग (Harbhajan Singh)-
भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने मार्च १९९८ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण, या गोलंदाजाला एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार असतानापासूनच संधी मिळणे कमी झाले होते. भारतीय संघात त्याची जागा आर अश्विनने घेतली होती.
धोनीपुर्वी भारतीय संघात पदार्पण करणारा हरभजन आता ४० वर्षांचा झाला आहे. धोनीने निवृत्ती घेतल्यामुळे हरभजनही त्याच्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
२०१२पासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या हरभजनने २०१५मध्ये संघात पुनरागमन केले होते. त्यानंतर तो २०१५-१६ मध्ये भारतीय संघाचा भाग होता. पण दरम्यान त्याला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. म्हणून त्याला पुन्हा संघातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर हरभजन भारतीय संघातील त्याचे स्थान परत मिळवू शकला नाही.
हरभजनला त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून जवळपास ४ वर्षे झाली आहेत. त्याने मार्च २०१६ला युनायटेड अरब इमिरेट्सविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. सध्याच्या भारतीय संघाविषयी पाहायचे झाले, तर संघात एकापेक्षा एक फिरकीपटू उपलब्ध आहेत. त्यामुळे हरभजनला क्वचितच भारतीय संघात पुनरागमन करायला मिळेल. अशात, जर हरभजन निवृत्ती घेऊन त्याच्या नव्या कारकिर्दीच्या दिशेने वाटचाल करु शकतो.
४. यूसुफ पठान (Yusuf Pathan)-
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू यूसुफ पठानने २००७मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याची क्रिकेट कारकिर्द जास्त मोठी राहिली नाही. त्याने केवळ चार वर्षे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहे. २०१२पासून तो भारतीय संघातून बाहेर आहे आणि अद्यापही त्याला पुनरागमनाची संधी मिळालेली नाही.
यूसुफ २००७ सालच्या टी२० विश्वचषक आणि २०११ सालच्या वनडे विश्वचषक संघाचा भाग होता. पण, नंतर हा अष्टपैलू क्रिकेटपटूला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये चांगली कामगीरी करता आली नाही. त्यामुळे त्याला २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी२० सामन्यानंतर भारतीय संघातून वगळण्यात आले. आयपीएल २०२०मध्येही त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
भारताकडून ५७ वनडे आणि २२ टी२० सामने खेळलेला यूसुफ आता ३७ वर्षांचा झाला आहे. तसेच भारतीय संघात रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांच्यासारखे दमदार अष्टपैलू क्रिकेटपचू उपलब्ध आहेत. त्यामुळे यूसुफ लवकरच त्याची निवृत्ती जाहीर करु शकतो.
३. पियुष चावला (Piyush Chawla)-
२००६ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पियुष चावलाला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने २०१२मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दरम्यानही त्याला जास्त संधी न मिळाल्यामुळे त्याने भारताकडून केवळ ३ कसोटी, २५ वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत.
३१ वर्षीय चावला गेल्या ७-८ वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे आणि क्वचितच त्याला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळेल. अशात हा खेळाडू त्याची निवृत्ती जाहीर करु शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी चावलाला जास्त संधी मिळाल्या नसल्या, तरी तो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून नियमितपणे खेळत आहे. आतापर्यंत त्याने १५७ सामने खेळत १५० विकेट्स चटकावल्या आहेत.
२. पार्थिव पटेल (Parthiv Patel)-
गेल्या २ वर्षांपासून भारतीय कसोटी आणि ८ वर्षांपासून मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला पार्थिव पटेलही त्याच्या निवृत्तीचा विचार करु शकतो. ३५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज पार्थिवने वयाच्या केवळ १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्ध त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
परंतु, २००४मध्ये भारतीय संघात एमएस धोनीने एंट्री केली आणि लवकरच संघातील स्वत:चे स्थान पक्के केले. पण, पार्थिवला मात्र स्वत:ला सिद्ध करण्यात जास्त यश आले नाही. तो २०१८ पर्यंत भारतीय संघातून आत-बाहेर होऊ लागला आणि संघातील पर्यायी यष्टीरक्षक फलंदाज बनून राहिला. पार्थिवने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त २५ कसोटी सामने खेळत ९३४ धावा, ३८ वनडे सामन्यात ७३६ धावा आणि २ टी२० सामन्यात ३६ धावा केल्या आहेत. पार्थिवने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अजून एकही शतक करता आले नाही.
१. विनय कुमार (Vinay Kumar)-
भारतीय क्रिकेटपटू विनय कुमारचे नाव त्या यादीत येते, जे धोनी-रैनानंतर लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करु शकतात. २०१०मध्ये विनयने भारतीय संघात पुनरागमन केले होते, पण तो जास्त काळ संघाचा भाग बनून राहिला नाही. २०१३नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
विनयने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १ कसोटी सामना खेळत १ विकेट, ३१ वनडे सामने खेळत ३८ विकेट्स आणि ९ टी२० सामने खेळत १० विकेट्स घेतल्या आहेत. अशा निराशादायी प्रदर्शनामुळे गेल्या ७ वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे तो लवकरच त्याची निवृत्ती जाहीर करु शकतो.