२०१९मध्ये पार पडलेल्या आयपीएल खेळाडू लिलावापासून चाहत्यांची नजर आयपीएल २०२०वर आहे. आयपीएल २०२०ची सुरुवात झाली की, प्रत्येकजण आपापल्या संघासाठी आनंद व्यक्त करताना दिसेल. आयपीएलची विशेषता ही आहे की, भारतीय संघातील अनेक दमदार खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसतात. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते आरसीबीला त्यांचा आवडता संघ मानतात. तर, एमएस धोनीचे चाहते चेन्नई सुपर किंग्सचा नारा लावतात. आपल्या संघाला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवणाऱ्या रोहित शर्माचे चाहते मुंबई इंडियन्सला चीअर करताना दिसतात.
यंदा आयपीएल पाहण्याची उत्सुकता दुप्पटीने वाढलेली दिसेल. कारण, २९ मार्च रोजी सुरु होणारा आयपीएलचा १३वा हंगाम कोरोना व्हायरसमुळे १९ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. त्याबरोबरच चाहत्यांचे काही आवडते भारतीय खेळाडू, जे बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेट खेळताना दिसले नाहीत. ते आयपीएलच्या १३व्या हंगामात मैदानावर खेळताना दिसतील. म्हणून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असणार.
या लेखात, आयपीएलद्वारे एका वर्षानंतर पुन्हा मैदानावर खेळताना दिसणाऱ्या ५ भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. 5 Indian Players Will Do Comeback In Cricket Through IPl 2020 After 1 Year
५. सुरेश रैना –
आयपीएलमध्ये सर्वप्रथम ५००० धावा पूर्ण करणारा सुरेश रैना हा एका वेळेला भारतीय संघाचा मधल्या फळीतील प्रमुख भाग होता. मात्र, जुलै २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर, रैनाला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर रैनाचे चाहते त्याला फक्त आयपीएलद्वारे खेळताना पाहतात. परंतु, आयपीएलच्या १२व्या हंगामापासून जवळपास एक वर्ष झाले, रैना क्रिकेट खेळताना दिसला नाही. त्यामुळे यंदा रैनाच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार.
बऱ्याच वर्षांपासून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये शीर्ष स्थानावर असणाऱ्या रैनाच्या नावावर सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम आहे. रैनाने २००८ ते २०१९ दरम्यान सर्वाधिक १९३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ५३६८ धावा केल्या आहेत. तसेच, ३३.३४ फलंदाजी सरासरी असणाऱ्या रैनाने आयपीएलमध्ये एक शतकही ठोकले आहे. सोबतच रैनाने २५ विकेट्सही चटकावल्या आहेत.
४. रॉबिन उथप्पा –
कर्नाटकचा रॉबिन उथप्पा २००६ साली इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरला होता. उथप्पाला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. पण, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडूलकर अशा दिग्गजांमुळे त्याला भारताकडून क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. पण, उथप्पाच्या देशांतर्गत प्रदर्शनामुळे त्याच्यातील क्षमतेवर कोणीही शंका करु शकत नाही.
त्याने गेल्या काही वर्षात एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समध्ये निवड झाल्यामुळे उथप्पा पुन्हा आपल्या प्रदर्शनाने कमाल करत दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल. उथप्पादेखील जवळपास एक वर्षे झाले क्रिकेट खेळताना दिसला नाही.
उथप्पाने आतापर्यंत १७७ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २८.८३च्या सरासरीने ४४११ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक ८७ धावांचा समावेश आहे. सोबतच यष्टीरक्षण करताना उथप्पाने ८४ झेल आणि ३२ यष्टीचीत विकेट्स घेतल्या आहेत.