आयपीएलमध्ये मंगळवार (29 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी पराभूत केले. हैदराबादने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करतांना दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 4 बाद केवळ 147 धावाच करता आल्या.
या सामन्यात हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने उत्कृष्ट गोलंदाजी केली. राशिदने 4 षटकांत केवळ 14 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. राशिदने घेतलेली रिषभ पंतची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट होता आणि तेथून हैदराबाद संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. यानंतर दिल्लीचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
खेळाच्या मूलभूत गोष्टी घेतो लक्षात
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी बोलताना राशिद म्हणाला, “सामन्यादरम्यान मी स्वत:वर दबाव येऊ देत नाही, मी शांत राहतो आणि पुढे काय करू शकतो यावर लक्ष केंद्रीत करतो. मी मैदानात उतरल्यावर खेळाच्या मूलभूत गोष्टी लक्षात घेतो. मी आज वेगवान गोलंदाजी केली, जेव्हा मी माझा पहिला चेंडू फेकला तेव्हा मला ते जाणवले. योग्य वेग जाणून घेण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन चेंडू फेकण्याची आवश्यक असते. अशा परिस्थितीत खेळपट्टीवर पुढे चेंडू फेकावा लागतो.”
राशिद झाला भावुक
गेली काही महिने राशिद खानसाठी कठीण होते. त्याचे वडील व आई यांचे निधन झाले. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर राशिद त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाला, “दीड वर्षापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर काही महिन्यांनंतर आईसुद्धा या जगातून निघून गेली. माझी आई माझी सर्वात मोठी चाहती होती. विशेषतः आयपीएलमध्ये खेळताना ती मला टीव्हीवर बघायची. जेव्हा मला सामनावीराचा पुरस्कार मिळायचा तेव्हा ती माझ्याशी रात्री बोलायची.”