काल (२० जुलै) आयसीसीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबरोबरच आयसीसीने असेही सांगितले की पुढीलवर्षी फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाबद्दही पुर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
तसेच आता या महिला विश्वचषकाबद्दल पुढील दोन आठवड्यांत निर्णय घेण्यात येईल असे यजमान न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटले आहे.
बार्कले यांनी रेडिओ एनझेडला सांगितले की, ‘येत्या दोन आठवड्यांत याबाबत निर्णय घेतला जाईल. कारण जर ही स्पर्धा पुढे ढकलण्याची गरज भासली तर आम्हाला त्याबद्दल लवकरात लवकर माहित असले पाहिजे.’
ग्रेग बार्कले म्हणाले, ‘जर या विश्वचषकाचे आयोजन करायचे असेल तर त्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल. जेणेकरून आम्ही फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जागतिक स्तरावरील या स्पर्धेसाठी आपली सर्व संसाधने उपलब्ध करु शकू.’
हा विश्वचषक न्यूझीलंड येथे ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. त्यात गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. अन्य ३ संघ अजून या स्पर्धेसाठी पात्र ठरायचे आहेत. हे सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, हॅमिल्टन, तौरंगा, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डूनडीन या ६ ठिकाणी होणार आहेत.
सध्या कोरोना व्हायरसचा सर्वात कमी फटका बसलेल्या देशांपैकी न्यूझीलंड हा एक देश आहे. परंतु असे असले तरी या महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध देशातील संघांचे आयोजन करणे सोपे नाही.
याबद्दल बार्कले म्हणाले, ‘जगभरातून येणाऱ्या संघांची व्यवस्था कशी करावी लागेल. त्यांना इथे येण्यासाठी अन्य देशांतून यावे लागेल, तर यासंबंधीचे काय नियम असतील? यानंतर त्यांना क्वारंटाईन केले जाईल. त्यामुळे अर्थातच खूप खर्च येईल. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे बजेट जास्त असेल.’
या विश्वचषकात सहभागी होणारे ८ संघ राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरी सुरु असताना एकमेकांशी सामना खेळेल. हे सामने झाल्यानंतर अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य सामन्यात विजयी झालेले संघ अंतिम सामन्यात खेळतील.
ट्रेंडिंग घडामोडी –
‘दूध वाया घालवण्यापेक्षा ते गरजू मुलांना द्या’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे मत






