इंग्लंड दौर्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला टी२० मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. आता शुक्रवार पासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. दोन्ही देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत ४० वर्षे जुना इतिहास बदलला जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या मालिकेत बदल करण्यात आले आहेत.
मालिकेतील तिन्ही सामने मॅनचेस्टर येथे खेळले जाणार आहेत. काल पहिला सामना झाला.तर दुसरा सामना १३ सप्टेंबर आणि शेवटचा अंतिम सामना १६ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजेपासून सुरू होतील.
बदलणार ४० वर्षे जुना इतिहास
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या द्विपक्षीय वनडे मालिकेत ४० वर्षांनंतर प्रथमच सर्व सामने एकाच मैदानावर खेळले जाणार आहेत. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. याअगोदर १९७९-८० ला ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या इंग्लंड संघाने मालिकेतील सर्व सामने मेलबर्नमधील एकाच मैदानावर खेळले होते.
आयसीसी विश्वचषक २०१९ पासून ऑस्ट्रेलिया संघाची वनडेत कामगिरी खूपच खराब राहिली आहे. विश्वचषक स्पर्धेपासून आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी संघाने ५ सामने गमावले तर केवळ २ सामने त्याने जिंकले आहेत. मागच्यावेळी इंग्लंड दौर्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता.
२०१८ मध्ये इंग्लंडने पाच सामन्यांची मालिका ५-० ने जिंकली होती. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ एकही सामना जिंकू शकला नाही. याअगोदर २०१७- १८ ला ऑस्ट्रेलिया दौर्यावर आलेल्या इंग्लंड संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत त्यांच्याच जमिनीवर ४-१ आशा फरकाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं.