आयपीएलमध्ये शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने 7 धावांनी विजय मिळवला. चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 28 धावांची गरज असताना हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने फिरकीपटू अब्दुल समदला गोलंदाजी देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. याबद्दल वॉर्नरने स्पष्टीकरण दिले आहे.
19 व्या षटकातील दुसरा चेंडू फेकताना भुवनेश्वर कुमार जखमी झाला. त्यामुळे हे षटक खलील अहमदने पूर्ण केले आणि शेवटचे षटक फिरकीपटू अब्दुल समदला टाकावे लागले.
पर्याय शिल्लक नव्हता म्हणून…
फिरकीपटू अब्दुल समदला गोलंदाजी देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला, “मी त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले. कारण माझ्याकडे एकही पर्याय नव्हता. खलीलने 19 व्या षटकात पाच चेंडू टाकले होते. फिरकीपटू अभिषेक शर्माचे षटक शिल्लक होते पण समद उंच खेळाडू आहे व त्याला त्याच्या लांबीचा फायदा होतो आणि त्याने सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती म्हणून मी त्याला गोलंदाजी दिली.”
या सामन्यात युवा प्रतिभावान खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादला सन्माननीय धावसंख्या गाठण्यास मदत केली. या दोघांनीही 77 धावांची भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.
युवा खेळाडूंनी खेळावा नैसर्गिक खेळ
युवा खेळाडूंबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला, “आमचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत हे पाहून मला आनंद झाला. त्यांनी आपला नैसर्गिक खेळ खेळावा असे मी युवा क्रिकेटपटूंना सांगेन. मला वाटले की आम्ही 150 धावा करू पण या युवा खेळाडूंनी खेळलेल्या खेळीमुळे आम्ही 160 पेक्षा जास्त धावा करू शकलो.”