भारतीय संघ सध्या जगातील सर्वोच्च संघांपैकी एक आहे. एक संघ यशस्वी होण्यासाठी कर्णधाराचा मोठा हात असतो. भारतीय संघ खूप भाग्यवान आहे की या संघाला एकामागून एक चांगले कर्णधार मिळाले. सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली हे असे कर्णधार आहेत की ज्यांच्या नेतृत्वात भारताने गेल्या अनेक वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या संघाचं वर्चस्व राखले आहे.
दरम्यान, २००३ मधील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने प्रवेश केला आणि २००७ मध्ये टी २० विश्वचषक व २०११ मध्ये विश्वचषक सुद्धा जिंकला. भारतीय संघ अनेक वर्षांपासून कसोटीमध्येही अव्वल क्रमांकावर राहिला. या व्यतिरिक्त बर्याच सामन्यांमध्ये संघाने पिछाडीवर पडतानाही जबरदस्त पुनरागमन केले. तथापि, असे काही सामने आहेत जेव्हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये असताना देखील पराभव पत्करावा लागला होता.
या लेखात आपण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी एक-एक सामन्याबद्दल जाणून घेऊयात, जे सामने मजबूत स्थितीत असूनही भारताने गमावले:
१. भारत वि. ऑस्ट्रेलिया, एडिलेड २०१३ (कसोटी क्रिकेट)-
डिसेंबर २०१३ मध्ये भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. ९ डिसेंबरला या मालिकेची पहिली कसोटी एडिलेड येथे खेळली गेली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात खेळत नव्हता, त्याच्या गैरहजेरीत विराट कोहली कर्णधार म्हणून भारताचा प्रतिनिधित्व करत होता.
हा एक मोठी धावसंख्या असलेला थरारक सामना होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर (१४५), मायकेल क्लार्क (१२८) आणि स्टीव्ह स्मिथ (१६२) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ५१७/७ अशा मोठ्या धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
प्रत्युत्तरादाखल भारताने पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने (११५) जबरदस्त शतक ठोकले आणि संपूर्ण संघ ४४४ धावांवर बाद झाला. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ७३ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ करताना डेव्हिड वॉर्नरच्या (१०२) शतकाच्या जोरावर २९०/५ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला ३६४ धावांचे लक्ष्य दिले.
शेवटच्या दिवशी भारताला फक्त ९८ षटकांत ३६४ धावा करायच्या होत्या. मात्र भारताने हार मानली नाही आणि भारतीय संघ जिंकण्यासाठी खेळला. शेवटच्या दिवशी डावाच्या सुरुवातीला लागलेल्या धक्क्यानंतर विराट कोहली आणि मुरली विजय याने १८३ धावांची शानदार भागीदारी केली.
यावेळेस असे वाटत होते की भारत हा सामना सहज जिंकेल. मात्र मुरली विजय (९९) बाद झाल्याबरोबर भारतीय डाव कोसळला. कोहलीने (१४१) शानदार शतक ठोकले, पण संघ ३१५ धावांतच गडगडला आणि सामना ४८ धावांनी गमावला. सामन्यात १२ बळी घेणारा ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियोनला सामनावीर म्हणून घोषित केले.
२. इंडिया वि. वेस्ट इंडीज, जमैका (वनडे क्रिकेट)
२००६ मध्ये भारताने ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला आणि मालिकेचा दुसरा सामना जमैका येथे खेळला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने रामनरेश सरवानच्या ९८ धावांच्या जोरावर ५० षटकांत १९८/९ धावा केल्या. भारताकडून इरफान पठाणने सर्वाधिक ३ बळी घेतले.
१९९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि नियमित अंतराने संघातील फलंदाज बाद होत गेले. एका वेळी संघाची धावसंख्या ६०/४ अशी कमी झाली. मात्र, युवराज सिंगने एक बाजू टिकवून ठेवली होती आणि त्याला सुरेश रैनाचा (२७) चांगला पाठिंबा मिळाला.
त्यांनी ६४ धावांची भागीदारी केली. येथून असं वाटत होतं की भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल. रैना बाद होताच डाव पुन्हा गडगडला. तरी पण युवीने हार मानली नाही. शेवटच्या षटकांपर्यंत तो क्रीजवर राहिला आणि सामन्यात त्याने भारताला कायम राखले.
शेवटच्या षटकात भारताला ११ धावांची गरज होती आणि मुनाफ पटेलने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत स्ट्राइक युवराजसिंगला दिली. युवराज सिंगने दुसर्या आणि तिसर्या चेंडूत ठोकत भारताला विजयी स्थितीत आणले. शेवटच्या तीन चेंडूंमध्ये भारताला २ धावांची आवश्यकता होती, पण चौथ्या चेंडूवर युवी त्रिफळाचित झाला आणि भारत हा सामना एका धावांनी गमावला.
३. भारत वि न्यूझीलंड, चेन्नई (टी २० क्रिकेट)
कर्करोगाशी लढून विजयी झालेल्या युवराज सिंगने न्यूझीलंडविरुद्ध पहिली मालिकेत पदार्पण करत पुन्हा मैदानात उताराला. विशाखापट्टणममध्ये खेळलेला पहिला सामना रद्द करण्यात आला आणि दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळविण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ब्रेंडन मॅकलमच्या ९१ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर १६७/५ धावा केल्या. १६८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीमुळे भारतीय संघालामजबूत स्थितीत नेले.
शेवटच्या षटकात विजयासाठी भारताला १३ धावांची आवश्यकता होती. चौथ्या चेंडूवर युवी बाद झाला आणि शेवटी संघाला शेवटच्या चेंडूवर ४ धावा करायच्या होत्या, परंतु संघ केवळ २ धावाच करू शकला आणि सामना एका धावांनी गमावला. ब्रॅंडन मॅकलमला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून निवडले गेले.