२००७ साली क्रिकेटविश्वात एका मोठ्या टूर्नामेंटची एंट्री झाली होती. दक्षिण आफ्रिकाने या टूर्नामेंटचे यजमानपद सांभाळले होते. विशेष म्हणजे, भारतीय संघाने या टूर्नामेंटच्या पहिल्याच वर्षात विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला होता. यावरुन सर्वांना अंदाज आला असेल की, ही कोणती टूर्नामेंट असेल. होय, ही टूर्नामेंट अर्थात ‘टी२० विश्वचषक’.
जगभरातील अनेक मोठमोठे संघ टी२० विश्वचषकाचा भाग होते. पण, भारतीय संघाने आणि पाकिस्तान संघाने शानदार कामगिरी करत टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. दोन्ही संघातील अंतिम सामना खूप रोमांचक झाला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९.३ षटकात १५२ धावा करत १० विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताने ५ धावांनी तो सामना जिंकला होता आणि विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या विजेतेपदाला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
भारतासाठी २००७ सालचा विश्वचषक जिंकणे हे कोणत्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, भारतीय संघात अधिकतर युवा खेळाडूंचा समावेश होता.
आजही त्या विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असणाऱ्या सर्व खेळाडूंची चर्चा होते. पण, कधी विचार केला आहे का, जर भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक जिंकला नसता, तर त्यांच्यावर त्याचे काय परिणाम झाले असते? या लेखात, जर भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक जिंकला नसता, तर भारतीय संघात काय बदल झाले असते, याचा आढावा घेण्यात आला आहे. (This Changes Should Happen In Team India If India Loses T20 World Cup 2007)
तर जाणून घेऊयात..
१. भारताला मिळाला नसता एमएस धोनीसारखा कर्णधार –
भारतीय संघाला एमएस धोनीसारखा महान कर्णधार मिळाला आहे, जो फलंदाजी, यष्टीरक्षण आणि संघाचे नेतृत्त्व करण्यात पटाईत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. त्याच्यामुळे भारतीय संघाने क्रिकेटविश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. पण, भारताने जर २००७ सालचा टी२० विश्वचषक जिंकला नसता, तर कदाचितच धोनी भारतीय संघाच्या नेतृत्त्वपदावर कायम राहिला असता.
कारण तेव्हाच्या परिस्थितींचा विचार केला, तर धोनी हा एकटाच भारतीय संघाचे नेतृत्त्वपद सांभाळण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दिसत होते. जर भारताने विश्वचषक जिंकला नसता, तर धोनीच्या प्रतिभेवर संघ व्यवस्थापकांनी जास्त विश्वास दाखवला नसता.
पण, धोनीने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आणि २००७ सालच्या टी२० विश्वचषकानंतर भारताला २०११ सालचा विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. धोनीची आता क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना केली जाते.
२. आयपीएलची सुरुवात झाली नसती –
जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय लीग अशी इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) ओळख आहे. आयपीएलची सुरुवात २००८ साली भारताने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर झाली. खरं तर, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटची सुरुवात २००५ साली होती. पण, टी२० क्रिकेटला २००७पर्यंत जास्त प्रसिद्धी मिळाली नव्हती. या कारणामुळेच पहिल्या टी२० विश्वचषकातून भारतीय संघातील अधिकतर वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतली होती. पण, भारताने चषक मिळवल्यानंतर या क्रिकेट प्रकाराला मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती मिळू लागली.
त्यानंतर बीसीसीआयचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारताने आयपीएल आयोजनाचा विचार केला. अशाप्रकारे आयपीएलची सुरुवात झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर, भारताने टी२० विश्वचषक जिंकला नसता, तर आयपीएलची सुरुवात झाली नसती.
३. आयपीएलमुळे भारतीय संघात निर्माण झाली छोटी अडचण –
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २००७ सालचा टी२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर आयपीएलची सुरुवात झाली. जगप्रसिद्ध आयपीएलमुळे भारताला अनेक दमदार खेळाडू मिळाले. यामध्ये जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचा समावेश होतो. पण या खेळाडूंमुळे भारतीय संघातील अनेक गुणवंत खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले. तसेच शुभमन गिल, सूर्यकुमार यादव अशा प्रतिभाशाली खेळाडूंना भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. असे असले तरी, आयपीएलमुळे भारतीय संघाला अनेक प्रतिभाशाली खेळाडूंसह चांगले पर्यायी खेळाडूदेखील उपलब्ध झाले.
४. भारतीय संघ नसता इतका मजबूत –
एमएस धोनीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. टी२० विश्वचषकावेळी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड अशा सीनियर भारतीय खेळाडूंनी संघातून त्यांची नावे मागे घेतल्यामुळे धोनीला कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार समजण्यात आले होते आणि नेतृत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. परिणामत: भारताला धोनीसारखा कर्णधार मिळाला. तसेच अनेक दमदार खेळाडू मिळाले, ज्यांच्यामुळे संघ जास्त मजबूत झाला.
ज्याप्रमाणे सौरव गांगुलीने धोनीला दमदार खेळाडू दिले. त्याप्रमाणेच धोनीने विराट कोहलीलाही दमदार खेळाडू दिले. रोहित शर्मा, शिखर धवन, रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि स्वत: विराटनेदेखील धोनीच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले होते. पण, जर धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी२० विश्वचषकावर त्यांचे नाव कोरले नसते, तर धोनी संभवत: भारताचा नियमित कर्णधार राहिला नसता आणि भारतीय संघाला सध्याचे अनेक चांगले खेळाडू मिळाले नसते.
५. भारतीय कसोटी आणि वनडे संघ नसता जास्त आक्रमक –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० हा क्रिकेट प्रकार आल्यामुळे क्रिकेटला गती मिळली. केवळ भारतीय क्रिकेट संघात नव्हे तर क्रिकेटविश्वातील इतर संघामध्येही या क्रिकेट प्रकाराचे क्रेज वाढली. परिणामत: टी२० क्रिकेट खेळल्यामुळे संघातील खेळाडूंची आक्रमकता वाढली. पुढे जाऊन हेच खेळाडू कसोटी आणि वनडे या क्रिकेट प्रकारातही आक्रमकतेने खेळू लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोहित शर्मा. रोहित वनडे आणि टी२० क्रिकेटसह कसोटीतही विस्फोटक फलंदाजी करताना दिसतो. यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, टी२० क्रिकेटमुळे कसोटी आणि वनडे क्रिकेटलाही थोड्या प्रमाणात गती मिळाली झाले.