---Advertisement---

या ३वेळी कॅप्टन कूल धोनीला आला होता जबरदस्त राग

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 7:33 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचमुळे त्याला ‘कॅप्टनकूल’ म्हणूनही ओळखले जाते.

धोनीला मैदानात खूप कमीवेळा त्याच्या भावना व्यक्त करताना चाहत्यांनी पाहिले आहे. त्यातच त्याला चिडलेले पाहणे तर दुर्मिळ गोष्ट आहे. पण अशा काही घडना क्रिकेट मैदानात घडल्या ज्यामुळे धोनीला राग अनावर झाला होता. अशाच काही घटनांचा घेतलेला आढावा –

दिपक चहरच्या नो बॉलवर चिडला धोनी –

2019 च्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामन्यात पंजाबला 12 चेंडूत 39 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी धोनीने चहरकडे चेंडू सोपवला. परंतू चहरने पहिले दोन चेंडू स्लो बॉल टाकले. पण हे दोन्ही चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वर असल्याने नो बॉल ठरले.

या दोन चेंडूवर पंजाबने 8 धावा काढल्या. त्यामुळे लगेचच धोनी चहरकडे आला आणि त्याच्याशी काही चर्चा केली. या चर्चेबद्दल चहरने सामन्यानंतर सांगितले होते की धोनी त्याच्यावर प्रचंड चिडला होता. पण चहरने या दोन चेंडूंनंतर चांगले पुनरागमन करताना केवळ 5 धावा देत डेव्हिड मिलरची विकेटही घेतली.

मायकल हसीला पंचांनी परत बोलवल्याने धोनीला झाला होता राग अनावर –

2012 ला ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत धोनी एकावेळी पंचांवर चिडला होता. झाले असे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात धोनीने सुरेश रैनाने टाकलेल्या चेंडूवर मायकल हसीला यष्टीचीत केले होते. मात्र मैदानावरील पंचांना हसी बाद आहे की नाही हे सांगणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी टीव्ही अंपायरची मदत घेतली.

त्यांनी दाखवलेल्या रिप्लेमध्ये हसी नाबाद असल्याचे दिसत होते. मात्र टीव्ही अंपायर ब्रुस ऑक्सेनफोर्डने बाद असा निर्णय दिला. त्यामुळे हसी पुन्हा माघारी निघाला होता. पण मैदानावरील पंच बिली बाऊडेन यांनी हसीला थांबवले आणि सांगितले की ऑक्सेनफोर्ड यांच्याकडून चूकून बाद चे बटन दाबले गेले होते. हसी नाबाद आहे.

या घटनेबद्दल मात्र धोनीचा राग अनावर झाला होता. तो पंचावरही चिडला होता. हसीने नंतर या जीवदानाचा फायदा घेत 52 चेंडूत 59 धावांची खेळी केली.

नो बॉलचा निर्णय बदल्याने डगआऊटमधून धोनीने मैदानात येत घातला पंचांशी वाद –

2019 आयपीएलदरम्यान  सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघातील सामन्यात राजस्थानने चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 58 धावांवर असताना बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले.

यावेळी धोनी बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाने खेळलेल्या पुढच्या चेंडूवर मैदानावरील पंच उल्हास गंधे यांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफॉर्डशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला. त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळात धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---