भारतीय क्रिकेटला दिग्गज फिरकी गोलंदाजांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून भारतीय क्रिकेटने जगाला एकापेक्षा एक अव्वल फिरकीपटू दिले आहेत. बेदी, प्रसन्ना चंद्रशेखर या तिकडीने तर विश्वक्रिकेट गाजवले होते. अनिल कुंबळे-हरभजन सिंह ही जोडी सुद्धा विश्वविक्रमी कामगिरी करण्यात यशस्वी ठरली. आताही, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव व चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीने भल्याभल्यांच्या नाकात दम करत आहेत. याच दरम्यान एक फिरकीपटू २००८-२०१३ अशी अवघी सहा वर्ष भारतीय संघात खेळला व आपल्या जादुई फिरकीने भारताचा अव्वल गोलंदाज बनला. आम्ही तुम्हाला सांगत आहोत आजचा ‘बर्थडे बॉय’ प्रज्ञान ओझा याच्याविषयी.
भारताचे माजी फिरकीपटू वेंकटपती राजू यांना आदर्श मानणाऱ्या प्रज्ञानने त्यांना पाहूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यासोबत दुसरा हैदराबादी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याबद्दलही प्रज्ञानला तितकाच आदर आहे. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या प्रज्ञानने २००४ मध्ये रणजी पदार्पण केले आणि त्याच वर्षी तो भारतीय युवा संघात निवडला गेला. २००६-०७ च्या रणजी करंडक हंगामात प्रज्ञानने जबरदस्त कामगिरी केली. त्याने फक्त ६ सामन्यांत २० च्या सरासरीने २९ बळी घेतले.
आपल्या टी२० पदार्पणातच ओझाने सनसनाटी कामगिरी करत सामनावीर किताब मिळवला होता. टी२० पदार्पणात सामनावीर पुरस्कार मिळवणारा दिनेश कार्तिकनंतर तो अवघा दुसरा खेळाडू होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत २१ धावा देऊन चार गडी बाद केले होते. त्याचप्रमाणे, ओझाचे कसोटी पदार्पण सुद्धा विक्रमी राहिले. श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळताना त्याने पहिल्या चेंडूवर तिलकरत्ने दिलशानला बाद करण्याची किमया केली. महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याचा विश्वविक्रमी ८०० बळी ओझाच होता.
२०१० मध्ये मोहाली येथे खेळलेली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी कदाचित व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नाबाद ७३ आणि इशांत शर्माच्या ३१ धावांसाठी प्रसिद्ध असेल, पण त्यामध्ये ओझाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याने सामन्यात ३ गडी बाद केले आणि २०५-९ नंतर संघाला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता असताना, १० चेंडूत नाबाद ५ धावा करण्यासाठी १९ मिनिटे मैदानावर थांबत भारताला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. २०११ मध्ये काउंटी क्लब सरेने त्याच्याशी करार केला होता. काउंटीमध्ये सुद्धा त्याने सरेसाठी अमूल्य योगदान देत ४ सामन्यात २४ बळी मिळवले.
ओझाच्या कारकिर्दीतील सर्वात्तम सामनाच दुर्दैवाने त्याचा अखेरचा सामना ठरला. सचिन तेंडुलकरचा अखेरचा सामना असलेल्या कसोटीत दोन्ही डावात पाच-पाच बळी मिळवत ओझा सामनावीर होता. मात्र, त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. आपल्या कसोटी कारकिर्दीत २४ कसोटी सामन्यात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, एकही सामना तो भारतीय उपखंडाच्या बाहेर खेळला नाही. २४ कसोटीत त्याने ११३ बळी मिळवले. २०१५ च्या अवैध गोलंदाजी शैली प्रकरणामुळे त्याच्यावर काही काळ बंदी आली. मात्र त्यानंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. ओझा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय धावांपेक्षाा बळी अधिक मिळवले आहेत.
ओझाने आपल्या फिरकीच्या जोरावर आयपीएल देखील गाजवले. २००९ च्या आयपीएल विजेत्या डेक्कन चार्जर्स संघाचा तो सदस्य होता तसेच २०१० आयपीएल मध्ये सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप त्याने आपल्या नावे केली होती. २०१३ व २०१५ अशी दोन वर्ष मुंबई इंडियन्सच्या विजेत्या संघात देखील त्याचा समावेश होता. २०११ चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबई संघाचा देखील तो भाग होता.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ओझा निश्चितच भारताचा सर्वोत्कृष्ट डावखुरा फिरकीपटू होता. पण, अश्विन व त्यानंतर जडेजाच्या गोलंदाजी सोबतच फलंदाजीतील कौशल्यामुळे ओझा मागे पडला.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवानंतर नेटकऱ्यांनी घेतला अर्शदीपचा समाचार, गलिच्छ भाषेत केली टीका
एका आठवड्यात हार्दिक झाला हिरोचा झिरो! बॅटिंग-बॉलिंग दोन्हीत फ्लॉप
INDvsPAK: दुसऱ्यांदा बाबरचा डाव स्वस्तात उरकला! यंदा पाकिस्तानविरुद्ध रवी चमकला