आपण अनेकदा क्षेत्ररक्षकाने थेट स्टंपवर चेंडू टाकून बेल्स उडवल्याच्या घटना ऐकतो. पण असे कधी ऐकले आहे का की एकाच थ्रोमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूच्या स्टंपवरील बेल्स उडाल्या. कोणी याबद्दल म्हणेल, असे कधी होऊ शकते का? पण असे झाले आहे. २६ ऑगस्ट १९७६ ला. या दिवशी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात स्कार्बोरो येथे एक वनडे सामना खेळला गेला होता.
हा सामना होण्याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ही मालिका वेस्ट इंडीजने ३-० फरकाने जिंकत यजमान इंग्लंडला धक्का दिला होता. त्यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होणार होती. २६ ऑगस्टला पहिला वनडे सामना होणार होता. या सामन्यातून तब्बल ७ खेळाडूंनी वनडे पदार्पण केले होते. यात इंग्लंडकडून ५ तर वेस्ट इंडिजकडून ३ क्रिकेटपटूंनी पदार्पण केले होते. यामध्ये इयान बॉथम, मायकल होल्डींग आणि ग्रॅहम गुच यांचा समावेश होता, जे पुढे जाऊन त्यांच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक बनले.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार असलेल्या क्लाईव्ह लॉईड यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनीही कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावत पहिल्या ३ विकेट्स झटपट घेतल्या. २३ धावांवर ३ बाद अशी त्यावेळी इंग्लंडची अवस्था झाली होती.
पण पुढे ग्रॅहम बार्लो यांनी इंग्लंडचा डाव सावरण्यास सुरुवात केली. त्यांना ग्रॅहम गुचने साथ दिली होती. पण तेही ३४ धावा करुन बाद झाले. पण या दरम्यान बार्लो यांनाही २ वेळा जीवदान मिळाले होते. ते १९ धावांवर खेळताना झेलबाद होताहोता वाचले, आणि नंतर बेनार्ड जुलीयनने स्वत:च्याच गोलंदाजीवर बार्लो यांना झेलबाद करण्याची संधी सोडली. त्यावेळी बार्लो ३८ धावांवर होते. नंतर गुच बाद झाल्यावर इयान बॉथमही लगेचच परतले. मात्र नंतर कर्णधार ऍलेन नॉटने बार्लो यांना चांगली साथ द्यायला सुरुवात केली.
बार्लो ७१ धावांवर असताना नॉटने एकेरी धावेसाठी कॉल दिला. यावेळी नॉट यांचे लक्ष लेगच्या दिशेने होते. त्यावेळी लाँग लेगला असलेल्या होल्डींग यांनी चेंडू पकडला आणि तो चेंडू जोरात स्ट्रायकर एन्ड्च्या दिशेला (यष्टीरक्षकाच्या दिशेला )फेकला. त्यामुळे त्या बाजूच्या स्टंपवरील बेल्स पडले. पण तोपर्यंत बार्लो क्रिजमध्ये पोहचले होते. पण तो चेंडू पकडण्यासाठी तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी ओव्हर थ्रो झाला असे समजून दुसरी धाव घेण्याचा प्रयन्त केला. पण होल्डींग यांनी केलेला थ्रो इतका जबरदस्त होता की त्या चेंडूने स्ट्रायकर एन्डचे स्टंप उडवून नॉन-स्ट्रायकर एन्ड्सच्या (गोलंदाजांच्या बाजूच्या) स्टंपलाही धक्का दिला होता. त्यावेळी दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मधे होते. त्यामुळे पुरता गोंधळ उडाला होता. एकाच थ्रोमध्ये दोन्ही बाजूच्या स्टंपवरील बेल्स पडण्याची दुर्मिळ घटना कदाचित पहिल्यांदाच घडली होती. याबाबत विस्डेन आणि ग्लासगो हेराल्ड यांनीही या दुर्मिळ घटनेचे वृत्त दिले होते.
पण दोन्ही बाजूचे बेल्स पडलेले पाहून वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने धावबादसाठी अपील केले. यावेळी मैदानावर उपस्थित असलेल्या पंच आर्थर जेप्सन आणि डेव्हिड कॉन्स्टंट यांनी बराचवेळ चर्चा केली आणि अखेर दोन्ही फलंदाजांना नाबाद घोषित केले. यावेळी त्यांनी सांगितले की जेव्हा होल्डींगने थ्रो केला तेव्हा स्ट्रायकर एन्डच्या स्टंपला चेंडू लागण्याआधी दोन्ही फलंदाज क्रिजमध्ये आले होते तसेच त्यानंतर दुसऱ्या बाजूचे बेल्स पडणे हे गृहीत धरले जाऊ शकत नाही.
अखेर नंतर बार्लो १३९ चेंडूत ८ चौकारांसह ८० धावांवर नाबाद राहिलो तर नॉट १६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडने बार्लो यांच्या खेळीच्या जोरावर ५५ षटकात ८ बाद २०२ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला २०३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला पहिला धक्का ३ धावांवरच बसला होता. पण त्या धक्क्यातून वेस्ट इंडिज लवकर सावरले. वेस्ट इंडिजकडून व्हिव रिचर्ड्स यांनी शतकी खेळी केली. त्यांना गोर्डन ग्रिनिज (२७), क्लाईव्ह लॉईड(२०), लॉरेन्स रोव(१०) यांनी चांगली साथ दिली. अखेर कॉलिस किंगने १ चौकार १ षटकारासह ९ चेंडूत नाबाद १४ धावा करत रिचर्ड्स यांच्यासह वेस्ट इंडिजला विजयी धावसंख्येपर्यंत पोहचवले. रिचर्ड्स यांनी १३३ चेंडूत २० चौकार आणि १ षटकारासह नाबाद ११९ धावा केल्या. तेच या सामन्याचे मानकरी देखील ठरले. पुढे ही मालिकाही वेस्ट इंडिजने ३-० ने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. पण असे असले तरी ही मालिका नेहमीच होल्डींग यांच्या थ्रो साठी लक्षात राहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगताय? अवघ्या ६ चेंडूत भारताचे ४ गडी बाद, कोण होते ते शिलेदार; वाचा सविस्तर
विराटचा ७ धावांवर बाद होऊनही मोठा कारनामा; रहाणे, रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा तिसराच भारतीय





