कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या यशामध्ये तिसर्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणारा फलंदाज हा तांत्रिक आणि मानसिक दृष्टिकोनातून तयार असावा लागतो. कारण तिसर्या क्रमांकाचा फलंदाज संघाच्या यशामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. कारण हा क्रमांक असा आहे जिथे त्या फलंदाजांला सलामीवीर लवकर बाद झाला तर सुरुवातीला सलामीवीराप्रमाणे भूमीका निभवावी लागते. तर कधी सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर मधल्या फळीत फलंदाजी करताना लय कायम ठेवावी लागते.
असे काही खेळाडू आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये तिसर्या क्रमांकावर खेळण्यात यश आले आहे आणि काही खेळाडू अपयशी ठरले.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाने सयंम ठेऊन फलंदाजी करणे आवश्यक असते. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या संघात तिसर्या क्रमांकावर काही बचावात्मक, काही वादळी तसेच परिस्थितीनुसार खेळणारे खेळाडू आहेत. या लेखात कसोटी क्रिकेटमधील तीन सर्वोत्कृष्ठ फलंदाजांचा उल्लेख आहे. ज्यांनी तिसऱ्या क्रमांकावर जबरदस्त फलंदाजी केली आहे.
कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारे ३ जबरदस्त फलंदाज
३,रिकी पॉन्टिंग
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने तिसर्या क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियाकडून ९९०४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३२ शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुल आणि हुकचे बरेच फटाके खेळले. एकेकाळी मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर मजबूत सलामीची जोडी होती आणि त्यापैकी एक बाद झाल्यानंतर फलंदाजीला येत पॉन्टिंग आपले काम अत्यंत चांगले पार पडायचा आणि ऑस्ट्रेलियाचा डाव सावरायचा. तो कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२.राहुल द्रविड
बरीच वर्षे भारतीय संघाकडून तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केलेला राहुल द्रविडला ‘द वॉल’ म्हणून संबोधले जाते. भारतीय संघासाठी त्याने या स्थानावर बर्याच धावा केल्या आहेत. द्रविडने तिसर्या क्रमांकावर ५२.८८ च्या सरासरीने १०५२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २८ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजांसमोर त्याने संयम आणि बचावात्मक खेळ केल्यामुळे गोलंदाजांसाठी तो डोकेदुखी ठरला. तो कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१. कुमार संगकारा
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा हा जेवढा चांगला यष्टीरक्षक आहे, तेवढाच चांगला तो कसोटी फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा कसोटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांबद्दल बोलले जाते तेव्हा संगकाराचे नाव प्रामुख्याने येते. त्याने अनेकदा श्रीलंकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तो कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ११६७९ धावा कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर केल्या आहेत. त्यात त्याने ३७ शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत.