इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) एकापेक्षा एक गोलंदाज होऊन गेलेत आणि आहेत, ज्यांनी आपल्या शानदार गोलंदाजीने फलंदाजांना तंबूत धाडलंय. त्या गोलंदाजांमध्ये सुनील नारायणचाही समावेश होतो. नारायणची गणना आयपीएलच्या सर्वात यशस्वी फिरकीपटूंमध्ये होते. तो २०१२ पासून आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग राहिला आहे. तसेच, त्याने आपल्या गोलंदाजीच्या दमावर आपल्या संघाला अनेक कठीण परिस्थितीतून सामना जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. नारायण नेहमीच फायदेशीर गोलंदाजी करतो. तसेच, त्याच्यासमोर फलंदाजांची बॅट शांत असल्याचे पाहायला मिळते.
वयाची तिशी (३३ वर्षे) पार केलेल्या सुनील नारायणने (Sunil Narine) आयपीएलच्या १३४ सामन्यांतील १३३ डावांमध्ये ६.७४च्या इकॉनॉमी रेटने १४३ विकेट्स घेतल्या आहेत. या आकडेवारीवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, नारायण विरोधी संघाच्या फलंदाजांवर किती दबाव आणत असेल. मात्र, काही फलंदाज असे आहेत, ज्यांनी आपल्या फलंदाजीतून नारायणला दिवसा चांदण्या दाखवल्या आहेत. आपण या लेखातून त्या ३ फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये नारायणविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत १ परदेशी, तर २ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे.
असे ३ भारतीय फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये सुनील नारायणविरुद्ध केल्यात सर्वाधिक धावा
३. सुरेश रैना
सुनील नारायणविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना (Suresh Raina) आहे. रैनाने नारायणविरुद्ध खेळलेल्या १४ डावांमध्ये १३५.६३च्या स्ट्राईक रेटने आणि ५९च्या सरासरीने ११८ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांचाही समावेश आहे. यावेळी तो फक्त २ वेळा बाद झाला आहे.
आयपीएलमध्ये नारायणच्या पदार्पणापूर्वीपासून रैना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात लायन्सकडून (२०१६, २०१७) खेळत होता. आयपीएल २०२२मध्ये अनसोल्ड राहिल्यामुळे तो कोणत्याही संघाचा भाग नाहीये. दुसरीकडे, नारायण अजूनही कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. अशात दोघेही या हंगामात एकमेकांचा सामना करू शकणार नाहीत.
२. रोहित शर्मा
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश आहे. रोहितने १८ डावांमध्ये १०७.८७च्या स्ट्राईक रेटने आणि १९.५७च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १५ चौकार आणि २ षटकारही ठोकले आहेत. यादरम्यान तो ७ वेळा बाद झाला आहे.
रोहित २०११ पासून आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. तसेच, त्याच्या नेतृत्वात मुंबईने ५ वेळा आयपीएल किताब जिंकला आहे. या हंगामातही दोन्ही खेळाडू एकमेकांचा सामना करताना दिसतील.
१. डेविड वॉर्नर
आयपीएलमध्ये फक्त एकमेव असा खेळाडू आहे, जो नारायणवर वर्चस्व गाजवताना दिसला आहे. तो खेळाडू म्हणजेच डेविड वॉर्नर (David Warner) होय. वॉर्नरने नारायणविरुद्ध १३ डावात १६४.५८च्या स्ट्राईक रेटने आणि ७९च्या सरासरीने १५८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १३ चौकार आणि ९ षटकारही ठोकले आहेत. यादरम्यान तो २ वेळा बाद झाला आहे.
वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग राहिला आहे. या हंगामात तो पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.
आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२२चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधारापुढे असतील बरीच आव्हाने, माजी कॅप्टनने केले सावधान