टी-२० क्रिकेट, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वात छोटे आणि जलद स्वरूप आहे. या ३ तासांच्या सामन्यात चाहत्यांना जलद खेळी तसेच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत असतो. या सामन्यांमध्ये अनेकदा असे निर्णायक क्षण देखील येत असतात, जिथे फलंदाजाला कमी चेंडुंमध्ये जास्त धावा करून सामना जिंकून द्यायचा असतो. असे खूप कमी वेळेस पाहायला मिळाले आहे, जिथे फलंदाजाने कमी चेंडूंमध्ये जास्त धावा करून सामनाही जिंकून दिला आणि सामनावीर पुरस्कारही पटकावला. या लेखात आम्ही अशाच काही फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ किंवा त्यापेक्षाही कमी चेंडू खेळून सामना जिंकून दिला आणि सामनावीर पुरस्कारही मिळवला.
१) ब्रॅड हॉग – ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉग हा टी-२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांपैकी एक होता. त्याने जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला. अशीच एक तुफानी खेळी त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी २०१४ मध्ये खेळली होती. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाचे आगमन झाले होते. ज्यामुळे सामना ७ षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ८१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी ब्रॅड हॉजने ८ चेंडूंमध्ये २१ धावा करत ऑस्ट्रेलिया संघाला सामना जिंकून दिला. तसेच सामनावीर पुरस्कार देखील पटकावला.
२) दिनेश कार्तिक – भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने वर्षानुवर्षे आठवण राहील अशी खेळी केली होती. २०१८ मध्ये झालेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या २ षटकात ३४ धावांची आवश्यकता होती. बांगलादेश संघाने त्यावेळी भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले होते. १९ व्या षटकात रूबेल हुसेन गोलंदाजीला आला होता. या षटकात दिनेश कार्तिकने २२ धावा चोपल्या होत्या.
त्यावेळी शेवटच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती. या षटकातील शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. एक चौकार आणि सामना सुपर ओव्हरमध्ये जाणार होता. तर एक षटकार भारतीय संघाला चॅम्पियन बनवणार होता. त्यावेळी दिनेश कार्तिकने सौम्य सरकारच्या चेंडूवर कव्हरच्या वरून षटकार मारला आणि भारतीय संघाला सामना जिंकून दिला होता. ८ चेंडूत नाबाद २९ धावा केल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
३) असिफ अली – असिफ अली टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिला असा फलंदाज ठरला, ज्याने १० पेक्षा कमी चेंडू खेळत सामनावीर पुरस्कार पटकावला. हा कारनामा त्याने टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अफगाणिस्तान संघाविरुद्ध केला. पाकिस्तान संघाला १२ चेंडूंमध्ये २४ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी असिफ अलीने एकाच षटकात ४ षटकार मारत पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला. त्याने या डावात ७ चेंडू खेळत नाबाद २५ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रम राठोड पुन्हा टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यास उत्सुक; म्हणाले, ‘अजून खूप काम बाकी’
वातावरण तापलं! डी कॉकचे सलग २ चौकार अन् बांगलादेशी गोलंदाजांचा चढला पारा, केली शिवीगाळ
निवृत्ती घेतलेल्या असगर अफगानच्या जागी ‘या’ खेळाडूची लागली वर्णी, भारतीय संघाला देणार टक्कर