इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू व्हायला, अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान स्पर्धेतील पहिलीच लढत आयपीएलचे ५ वेळेस विजेते मुंबई इंडियन्स आणि आयपीएलचे ३ वेळेस विजेते चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आली होती.
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात युवा गोलंदाज आणि अनुभवी गोलंदाजांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात देखील हे गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. चला तर पाहूया, कोण आहेत ते ३ गोलंदाज जे स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक गडी बाद करू शकतात.
१) राहुल चाहर : या यादीत सर्वोच्च स्थानी आहे, मुंबई इंडियन्स संघाचा फिरकीपटू राहुल चाहर. राहुल चाहरने आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज असायची तेव्हा रोहित शर्मा राहुल चाहरला गोलंदाजी करण्यासाठी बोलवायचा. चाहरने पहिले षटक टाकण्यापासून ते शेवटच्या षटकांमध्ये देखील गोलंदाजी केली आहे. युएईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करते. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात गोलंदाजी करताना ७ सामन्यात एकूण ११ गडी बाद केले होते. त्यामुळे तो दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो.
२) युझवेंद्र चहल : या यादीत दुसऱ्या स्थानी देखील भारतीय फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. युएईमध्ये युझवेंद्र चहलने अप्रतिम कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. परंतु युएईमध्ये पार पडणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात तो चांगली कामगिरी करू शकतो. गतवर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने एकूण १५ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याला २५ गडी बाद करण्यात यश आले होते. दरम्यान युएईमधील अप्रतिम कामगिरी पाहता तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो. त्याने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याला ४ गडी बाद करण्यात यश आले होते.
३) कागिसो रबाडा : या यादीत तिसऱ्या स्थानी कागिसो रबाडाचे नाव आहे. कागिसो रबाडाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही चांगली कामगिरी केली होती. परंतु दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईमध्ये आयोजित केले जाणार आहेत, जिथे त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हुकूमी एक्का ठरू शकतो. गतवर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल हंगामात त्याने १७ सामन्यात ३० गडी बाद केले होते. त्याची ही अप्रतिम कामगिरी पाहून, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात देखील तो चांगली कामगिरी करेल.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ ३ कारणांमुळे रोहितला टी२०चा कर्णधार बनवणे बीसीसीआयची मोठी चूक, नंतर होईल पश्चाताप!
‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा
‘कोहली धोनीच्या मार्गावर चालतोय, तो आता नव्या कर्णधारांना घडवेल’, बालपणीच्या कोचचा दावा