सचिन तेंडुलकरला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सचिनने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत, जे मोडणे सोपे काम नाही. एक काळ असा होता जेव्हा भारतीय संघाची फलंदाजी सचिनवरच अवलंबून होती. त्याने आपल्या तंत्र आणि आक्रमकतेच्या मिश्रणाने जगातील महान गोलंदाजांनाही सळो की पळो करून सोडले होते.
सचिन तेंडुलकरने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळ्या खेळल्या आहेत. त्यामुळेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अनेकवेळा सचिन तेंडुलकरने आपला झंझावाती खेळ दाखवून विरोधी संघासमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. त्याच्या खेळातील प्रत्येक फटका आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा आणि मैदानावरील प्रेक्षक या फटक्यांचा मनमुराद आनंद लुटायचे. सचिनने अनेक संस्मरणीय खेळी झाल्या आहेत, पण या लेखात आपण त्या वादळी खेळींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित कुणीही कधी ऐकल्या नसतील.
१. २७ चेंडूत ७२ धावा, क्राइस्टचर्च, २००२
सुपर मॅक्स इंटरनॅशनल ही संकल्पना भारताच्या २००२ च्या न्यूझीलंड दौर्यादरम्यान मांडण्यात आली. त्यात प्रत्येकी दहा षटकांच्या दोन डावांचा समावेश होता. या सामन्याच्या पहिल्या डावात सचिनने २७ चेंडूत ७२ धावा केल्या. गोलंदाजाच्या मागे एक मॅक्स झोन असायचा, जिथे फटका मारल्यास दुप्पट धावा मिळत असत. तिथून सचिनला दोनदा ८ आणि १२ धावा मिळाल्या होत्या. सचिनने याआधी असा प्रकार खेळला नव्हता पण प्रेक्षकांनी या खेळीचा आनंद लुटला.
२. लॉर्ड्स, १९९८ (११४ चेंडूत, १२५ धावा)
हा सामना मेरीलेबोन क्रिकेट क्लब आणि ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ यांच्यात होता आणि ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ संघाकडून सचिनने शतक झळकावले होते. एमसीसीने २६१ धावा केल्या आणि ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ संघाने २६२ धावा करून सामना जिंकला होता. सचिनने ११४ चेंडूत १२५ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने १५ चौकार आणि ४ षटकार मारले होते. हा सामना १८ जुलै १९९८ रोजी झाला होता.
३. केनिंग्टन ओव्हल, लंडन २००६ ( २६ चेंडू,५० धावा)
हा दहा षटकांचा प्रदर्शनीय सामना होता. हा सामना १० जुलै २००६ रोजी खेळला गेला होता. आंतरराष्ट्रीय इलेव्हन आणि पाकिस्तान इलेव्हन यांच्यात हा सामना खेळवला गेला. सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय इलेव्हनकडून खेळत होता. सचिनसोबत ब्रायन लारा आणि एमएस धोनीही संघात होते. लारा आणि सचिनने डावाची सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात २१ चेंडूत ३२ धावा करून लारा बाद झाला. सचिनने २६ चेंडूत पन्नास तर धोनीने १३ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. सचिनच्या संघाने दहा षटकात १२३ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तान संघाने सहा विकेट्स राखून सामना जिंकला होता.