कसोटी क्रिकेटची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीच्या दशकात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांची दशहत असायची. स्वातंत्र्यानंतर भारतीय संघात सुनिल गावसकरांसारख्या दिग्गज फलंदाजांची भर पडली. मात्र, संघाला मजबूत गोलंदाजांची आवश्यकता होती. जे गोलंदाजीत तर पारंगत असावेत मात्र त्यांची फलंदाजीही कधी ना कधी संघाच्या उपयोगी पडायला हवी. कारण, भारतीय संघ फक्त चांगल्या फलंदाजांच्या जोरावर चालत असायचा. जर एखाद्या वेळेला सर्व फलंदाज बाद झाले. तर त्यानंतर गोलंदाजांना थोड्याफार धावाही करता येत नसायच्या आणि परिणामत: भारताला सामना आपल्या हातून गमवावा लागायचा.
पण, वेळेनुसार गोष्टी बदलत गेल्या. भारतीय कसोटी संघाबाबतही असेच झाले. हळू-हळू भारतीय संघाला असे काही गोलंदाज मिळाले, जे गोलंदाजीव्यतिरिक्त फलंदाजीतही थोडीफार कामगिरी करु शकत होते. याचा बऱ्याचदा भारताला फायदा झाला. पुढे तर असे काही गोलंदाज आले, ज्यांच्यात दिर्घकाळ खेळपट्टीवर टिकून मोठ-मोठे शॉट्स मारत फलंदाजी करण्याची क्षमता होती.
या लेखात आपण अशाच काही गोलंदाजांविषयी पाहणार आहोत, जे गोलंदाजीत तर पारंगत होतेच. मात्र, त्यांची फलंदाजीही इतकी उत्तम होती की त्यांनी शतक करण्याचा कारनामा केला.
कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारे ३ भारतीय गोलंदाज
अजित आगरकर
भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरची त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे आजही आठवण काढली जाते. या गोलंदाजाने फलंदाजीतही आपली कर्तबगिरी दाखवली होती. २००२साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.
त्या सामन्यातील दुसऱ्या डावात ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना आगरकरने १६ चौकारांच्या मदतीने नाबाद १०९ धावा केल्या होत्या. मात्र, भारताने तो सामना १७० धावांनी गमावला होता. ते आगरकरचे कसोटीतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव शतक ठरले.
आगरकरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २६ कसोटी सामन्यात ५०१ धावा केल्या आहेत.
अनिल कुंबळे
जंबो या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे हा त्याच्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. अनुभवानुसार आपल्या गोलंदाजीसह फलंदाजीतही बदल करत या खेळाडूने कसोटीत २ हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. मात्र, कुंबळेची फलंदाजी जास्त नावारुपाला आली ती त्याच्या कसोटीतील पहिल्या शतकानंतर.
२००७मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात द ओव्हल येथे कुंबळेने आपले पहिले कसोटी शतक केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात ८व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या होत्या. तो सामना अनिर्णित राहिला होता.
कुंबळेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १३२ सामन्यात २५०६ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५ अर्धशतकांचाही समावेश आहे.
हरभजन सिंग
भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे, ज्याने कसोटीत २ शतके केली आहेत. विशेष म्हणजे, त्याने ही दोन्ही शतके सलग एकाच देशाविरुद्ध केली आहेत.
२०१०मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात हरभजनने त्याचे पहिले कसोटी शतक केले होते. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने ११५ धावा करत शतकी खेळी केली होती. शिवाय याच सामन्यातील पहिल्या डावात त्याने अर्धशतकही केले होते. तर, हैद्रबाद येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावातच त्याने नाबाद १११ धावासंह दुसरे शतक जडले होते.
हरभजनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १०३ सामन्यात २२२५ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात…
टी२०मध्ये शेवटचे षटक निर्धाव टाकणारे ४ गोलंदाज; एक नाव आहे भारतीय
‘या’ ५ भारतीय फलंदाजांनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाची शक्यता आहे खूप कमी