मागील अनेक वर्षांपासून विराट कोहली भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारात कर्णधार आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चांगली कामगिरी देखील केली आहे. तो भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधारही ठरला आहे. पण सध्या विराट ३१ वर्षांचा आहे. तसेच जर कोणत्याही कारणामुळे त्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन काढले किंवा त्याने जर कर्णधारपद सोडले तर भारताकडे सध्या त्याच्याऐवजी कर्णधारपद सोपवण्यासाठी काही खेळाडूंचा पर्याय आहे. या खेळाडूंचा घेतलेला आढावा –
विराटसोडून भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळू शकणारे ३ खेळाडू –
३. रोहित शर्मा –
भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा सध्या वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार आहे. तसेच त्याने अनेकदा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाचे चांगले नेतृत्वही केले आहे. रोहितने याआधी आशिया चषकात, निदाहास ट्रॉफी, अशा महत्त्वाच्या मालिकांमध्ये नेतृत्व केले आहे.
रोहितने आत्तापर्यंत १० वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यातील ८ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर रोहितने १९ टी२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील केवळ ४ सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. तर १५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
तसेेच रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या ४ मोसामांचे आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. तो आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे रोहितचा भारताचा नियमित कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकतो.
पण त्याच्या विरोधात एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याचे वय. रोहित सध्या ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे जर विराट अजून २ ते ३ वर्षे जरी कर्णधार राहिला तरी रोहितसाठी कर्णधारपद मिळणे कठीण होईल. कारण त्यावेळी बीसीसीआय भारतीय संघाच्या भविष्यासाठी एखाद्या युवा खेळाडूचा कर्णधार म्हणून विचार करु शकते.
२. केएल राहुल –
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने मागील काही महिन्यात शानदार कामगिरी करत संघातील स्थान पक्के केले आहे. विशेष म्हणजे मागील काही सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाचे यष्टीरक्षणही सांभाळले आहे. त्यामुळे यष्टीरक्षक कर्णधार असेल तर त्याला मैदानावरील खेळाडूंची स्थिती समजण्यास जास्त मदत होते, असे म्हटले जाते. त्यामुळे त्याच्यासाठी ही एक जमेची बाजू ठरु शकते.
त्याने आत्तापर्यंत कधी भारतीय संघाचे संपूर्ण सामन्यात नेतृत्व केलेले नाही. परंतू नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील पाचव्या टी२० सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत आणि प्रभारी कर्णधार असलेल्या रोहितला दुखापत झाल्यानेे राहुलने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण करताना नेतृत्वही केले होते.
त्याचबरोबर त्याला २०२० च्या आयपीएलसाठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. तसेच तो सध्या २८ वर्षांचा असल्याने त्याला भारतीय संघाचे नेतृत्व भविष्यात मिळू शकते.
१. श्रेयस अय्यर –
मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये मागील काही दिवसात चांगली कामगिरी केल्याने श्रेयस अय्यरने भारतीय संघात मधल्या फळीत स्थान पक्के केले आहे. श्रेयसमुळे भारताचे मर्यादीत षटकांसाठी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सध्यातरी मिटला आहे. तसेच श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या काही सामन्यांमध्ये नेतृत्वही केले आहे.
एवढेच नाही तर श्रेयसने दिल्ली कॅपिटल्स संघाचे २०१८ च्या मोसमातील काही सामन्यात आणि २०१९ च्या पूर्ण मोसमात नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर २०२० मोसमासाठीही तोच दिल्लीचा कर्णधार असणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या आयपीएलमोसमात दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेशही मिळवला होता. त्यामुळे श्रेयसकडे नेतृत्वगुण असल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
त्याचबरोबर श्रेयससाठी जमेची बाजू ही त्याचे वय आहे. तो सध्या केवळ २५ वर्षांचा आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या पुढील काही वर्षांतील भविष्याचा विचार करता श्रेयसकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ प्रसिध्द गोलंदाज
४ असे भारतीय खेळाडू, जे आपल्या शेवटच्या मालिकेत ठरले सुपर फ्लाॅप
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज