भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कोरोना महामारीनंतर भारतीय संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दौर्यावर गेला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत ऑस्ट्रेलियामध्ये तीनही क्रिकेट प्रकारातील सामन्यांच्या मालिका खेळेल. २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने दौऱ्याला प्रारंभ होईल. तीन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर, तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येईल. त्यानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने दौरा संपेल.
विराट कोहली सलग तिसऱ्यांदा भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्व करेल. मागील दौऱ्यात भारतीय संघाने वनडे व कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता, तर टी२० मालिका बरोबरीत सोडवली होती. विराटच्या नेतृत्वातील या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण दिसून येते. मात्र, सध्याच्या भारतीय संघातील काही असे खेळाडू आहेत, जे कदाचित अखेरच्या वेळी ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना दिसून येतील.
आज, आम्ही तुम्हाला याच तीन खेळाडूंविषयी सांगणार आहोत, जे कदाचित आपल्या कारकिर्दीत पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना दिसणार नाहीत.
१. आर अश्विन
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अतुल्य योगदान दिले आहे. २०११ मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर तो आजतागायत भारताचा क्रमांक एकचा फिरकीपटू आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७१ कसोटींमध्ये त्याच्या नावे ३६५ बळींची नोंद आहे. भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर दादा असणारा अश्विन विदेशी खेळपट्ट्यांवर काहीसा निष्प्रभ ठरतो.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळेल. या चार सामन्यात अश्विनच्या अनुभवाचा कस लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अश्विनची कामगिरी तितकीशी प्रभावी राहिली नाही. सध्या ३४ वर्षाचा असलेला अश्विन पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी संघात असेल, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. कारण, भारताचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा तीन किंवा चार वर्षांनी होऊ शकतो. या दौऱ्यात अश्विनने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याला पुढील दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
२. उमेश यादव
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव चौथ्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यासह तो भारताच्या वेगवान माऱ्याचे प्रतिनिधित्व करेल. आपल्या वेगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उमेशची ऑस्ट्रेलियामधील कामगिरी संमिश्र राहिली आहे.
सध्या ३३ वर्षांच्या उमेशला आगामी कसोटी मालिकेत किती संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण, बुमराह व शमी हे भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. ईशांत शर्मा दुखापतीतून सावरला, तर तो तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळेल. उमेशला मिळणाऱ्या मर्यादित संधीचे सोने करावे लागेल. कारण, युवा नवदीप सैनी सध्या चांगली कामगिरी करत आहे. या दौर्यात उमेश अपयशी ठरला, तर सैनी त्याचा पर्याय म्हणून पुढील वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता आहे.
३. वृद्धिमान साहा
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, वृद्धिमान साहा भारताचा यष्टिरक्षक बनला. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, वृद्धिमान भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक असल्याची कबुली दिली आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याची कामगिरी अफलातून असली, तरी फलंदाज म्हणून तो काहीसा अपयशी ठरलेला दिसून येतो.
वृद्धिमानचे वय सध्या ३६ वर्ष आहे. सोबतच, संघ व्यवस्थापन त्याचा पर्याय म्हणून रिषभ पंतला संधी देत असल्याचे, दिसून येते. वय, फॉर्म आणि दुखापती या सर्व कारणांमुळे वृद्धिमानचे पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणे, जवळपास अशक्य आहे.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळलेल्या लक्ष्मणच्या पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्या
किती हे दुर्देव! उत्कृष्ट कामगिरी करूनही टीम इंडियात स्थान टिकवू न शकलेले ३ भारतीय खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘विराट’सेना नेहमीच ठरली वरचढ, पाहा आकडेवारी
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश