भारतीय क्रिकेट संघ याक्षणी जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात उत्तम खेळ दाखवत आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. जिथे त्यांना कसोटी, एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळायच्या आहेत..
भारतीय संघाच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे वर्तमान संघात असलेली दिग्गज खेळाडूंची उपस्थिती. जर, आपण भारताच्या तीनही प्रकारातील संघांकडे पाहिले तर, असे बरेच प्रतिभावंत खेळाडू दिसून येतात, जे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. यापैकी काही खेळाडू, फक्त कसोटी संघाचा भाग आहेत. तर, काही खेळाडू केवळ वनडे आणि टी२० सामने खेळतात.
भारताच्या सध्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे काही वर्षांपूर्वी तिन्ही प्रकारच्या संघांमध्ये सामील असायचे. मात्र, त्यांची कारकीर्द जसजशी पुढे सरकली, तसतसे ते केवळ एका प्रकारातील क्रिकेट खेळाडू बनून राहिले. भारतीय संघात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना वनडेमध्ये संधी मिळत नाही आणि जे वनडे खेळतात त्यांना कसोटीत संधी मिळत नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच तीन खेळाडूंविषयी सांगणार आहे, जे सध्या कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहेत. मात्र, भविष्यात मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसू शकणार नाहीत.
१) रविचंद्रन आश्विन
भारतीय कसोटी संघाचा अव्वल फिरकीपटू असलेला रविचंद्रन आश्विन कदाचित यापुढे भारतीय संघाची निळी जर्सी घालून खेळणार नाही. अश्विन २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीपासून सलगपणे वनडे व टी२० संघाबाहेर आहे. अश्विनने आतापर्यंत भारतासाठी १११ वनडे व ४६ टी२० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने अनुक्रमे १५० व ५२ बळी मिळवले आहेत.
कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांनी मर्यादित षटकांच्या संघातील फिरकीपटूंची स्थाने काबीज केल्याने, अश्विनला फक्त कसोटीचा खेळाडू म्हणून खेळावे लागत आहे. भारताचे युवा फिरकीपटू राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर व वरुण चक्रवर्ती चांगली कामगिरी करत असल्याने, अश्विनचे वनडे व टी२० संघात पुनरागमन करणे जिकिरीचे बनलेले दिसून येते.
२) अजिंक्य रहाणे
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे काही वर्षांपूर्वी भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचा नियमित सदस्य होता. २०१५ वनडे विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात, रहाणेने मोलाचा हातभार लावला होता. मात्र, तो देखील सध्या फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. रहाणेने भारतासाठी ९० वनडे सामने खेळले आहेत. त्याने आपला अखेरचा टी२० सामना सन २०१६ मध्ये तर, अखेरचा वनडे सामना २०१८ मध्ये खेळला होता.
भारताच्या मर्यादित षटकांचे संघ फलंदाजीच्या दृष्टीने संतुलित आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल व श्रेयस अय्यर यांच्यासारखे फलंदाज संघात असल्याने, रहाणेला वनडे किंवा टी२० संघात संधी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
३) इशांत शर्मा
सध्याच्या भारतीय संघात सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या इशांत शर्माचे भविष्यात वनडे व टी२० क्रिकेट खेळणे जवळपास अशक्य आहे. २००८ ते २०१३ या काळात भारताच्या तीनही संघांचा महत्त्वाचा गोलंदाज राहिलेला इशांत सध्या कसोटीपटू म्हणून ओळखला जातो. भारताकडून ८० वनडे व १४ टी२० सामने खेळलेला इशांत २०१६ पासून मर्यादित षटकांचा एकही सामना खेळलेला नाही.
इशांत सध्या ३३ वर्षाचा आहे. तसेच, तो वारंवार दुखापतग्रस्त होत असतो. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी हे गोलंदाज मर्यादित षटकांच्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत असल्याने इशांत वनडे आणि टी२० संघात दिसेल, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम करण्यास रॉस टेलर सज्ज
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश
बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची
विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक