क्रिकेट इतिहासाबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, विरेंद्र सेहवाग, स्टीव्ह वॉ, कपिल देव, इम्रान खान, वसीम अक्रम, ब्रायन लारा, जॅक कॅलिस, कर्टनी वॉल्श, विवियन रिचर्ड्स यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश होतो. यांपैकी काही खेळाडू उत्कृष्ट फलंदाज होते, तर काही खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज होते. तसेच, काही खेळाडू चांगले अष्टपैलू होते. अष्टपैलू खेळाडू अनेकदा संघाला समतोल साधून देतात. त्यामुळे त्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरते.
आतापर्यंत असे अनेक अष्टपैलू खेळाडू झाले आहेत, ज्यांनी आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी कौशल्याने संघाला सामना जिंकून दिला आहे. जर कोणत्याही संघात २ किंवा ३ उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असतील, तर तो संतुलित संघ बनतो. तसेच, काही खेळाडू असेही असतात, जे पार्ट टाईम (अर्धवेळ) गोलंदाज असतात. परंतु तेदेखील विकेट्स घेत करत संघाला विजय मिळवून देतात.
भारतीय संघाने आतापर्यंत ३ विश्वचषक ( १९८३ वनडे विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २००७ टी२०) आपल्या नावावर केले आहेत. त्या तिन्ही विश्वचषकात अष्टपैलू खेळाडूंनी मोठे योगदान दिले होते. महत्त्वाच्या वेळी अष्टपैलू खेळाडू खूप कामी येतात आणि मोठ-मोठ्या स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचे योगदान देतात.
चला तर मग जाणून घेऊया त्या ३ अष्टपैलू खेळाडूंबद्दल, ज्यांनी एकाच वनडे सामन्यात शतकही ठोकले आणि ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्सदेखील घेतले आहेत.
एकाच वनडे सामन्यात शतक आणि ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे ३ खेळाडू- 3 Players with Century and 5 or more Wickets in an ODI Match
३. रोहन मुस्तफा (यूएई)
यूएई संघाचा अष्टपैलू खेळाडू रोहन मुस्तफाने (Rohan Mustafa) ४ एप्रिल २०१७ला पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध खेळताना एकाच वनडे सामन्यात शतक आणि ५ किंवा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. अबुधाबी येथे खेळण्यात आलेल्या त्या सामन्यात रोहन यूएई संघाचा कर्णधार होता. त्याने १२५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली होती. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजीतही कमाल करत ८.२ षटकात २५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याच्या या कामगिरीमुळे यूएईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पापुआ न्यू गिनी संघाचा डाव १४८ धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे यूएईने तो सामना १०३ धावांनी आपल्या नावावर केला होता.
२. पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड)
इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१ जून २००५ला नॉटिंघम येथे बांगलादेशविरुद्धच्या एकाच वनडे सामन्यात शतक आणि ५ किंवा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्याने त्या सामन्यात ८६ चेंडूत ५ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ११२ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच, गोलंदाजी करताना त्याने १० षटकात ३१ धावा देत ६ विकेट्स मिळवल्या होत्या.
कॉलिंगवूडच्या धडाकेबाज खेळीमुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर ३९१ धावांचे मोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल बांगलादेश संघाचा डाव केवळ २२३ धावांवरच संपुष्टात आला होता. अशाप्रकारे इंग्लंडने बांगलादेशवर १६८ धावांनी विजय मिळविला होता.
१. सर विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)
एकाच वनडे सामन्यात शतक आणि ५ किंवा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा पहिल्यांदा वेस्ट इंडीज संघाचे माजी विस्फोटक फलंदाज सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांनी केला होता. त्यांच्यासमोर गोलंदाजी करताना अनेक दिग्गज गोलंदाजांनाही घाम फुटत होता. ते एक दिग्गज फलंदाजाबरोबरच एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. त्यांच्या नावावर वनडेत ११८ विकेट्सही आहेत.
त्यांनी १८ मार्च १९८७ साली न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना ११३ चेंडूत ११९ धावांची शतकी खेळी केली होती. त्यात ४ षटकार आणि १० चौकारांचाही समावेश होता. तसेच, गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी १० षटकात ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्या सामन्यात रिचर्ड्स यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडला केवळ १४२ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे तो सामना विंडीज संघाने ९५ धावांनी जिंकला होता.
वाचनीय लेख-
-भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकलेले ५ खेळाडू; एक आहेत विश्वविजेत्या दिग्गज खेळाडूचे वडील
-कोण म्हणतं ‘प्रेम’ एकदाच होतं, या क्रिकेटरला झालंय १० वेळा
-महिला क्रिकेटपटूंनी केलेले ‘ते’ ५ विक्रम, जे पुरुष क्रिकेटपटूंनाही मोडणे केवळ अशक्य