ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय संघाचा शुक्रवारी(27 नोव्हेंबर) दारुण पराभव झाला. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला 66 धावांनी पराभूत करत, आमच्या देशात आम्हीच वाघ आहोत, हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाच्या काही फलंदाजांनी दमदार खेळी साकारली तर गोलंदाजांनीसुद्धा भेदक मारा करत वर्चस्व राखले. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करता आले नाही.
हा वनडे सामना खेळण्याआधी दोन्ही संघातील बरेचसे खेळाडू आयपीएल 2020 चा हंगाम खेळून आले होते. तसेच या सामन्यात भारतीय संघात रोहित शर्माची पुरेपूर उणीव जाणवली. आज आपण भारताच्या पहिल्या वनडे सामन्यातील पराभवाला कोणती तीन कारणे जबाबदार आहेत, ते पाहणार आहोत.
1. फिंच आणि स्मिथ यांची शतके
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करताना शतके ठोकली. स्टीव्ह स्मिथने फक्त 62 चेंडूत शतक पूर्ण केले. स्मिथने आक्रमक खेळताना 105 धावांची खेळी केली. तर फिंचने 114 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेलनेही 19 चेंडूत 45 धावांचा तडाखा दिला. तर डेविड वॉर्नरने 69 धावांची अर्धशतकी खेळी केली.
2. भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची खराब कामगिरी
भारताचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या धावा रोखण्यात अपयशी ठरले. मोहम्मद शमीचा अपवाद वगळता बाकी सर्व गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली. यामध्ये जसप्रीत बुमराहचा ही समावेश होता. गोलंदाजांकडून कणखरपणा दाखवला गेला असता, तर कदाचित ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले असते आणि या सामन्याचा निकाल वेगळा असता. याबरोबरच क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडूंकडून बऱ्याच चुका झाल्या. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुरेपूर उचलला.
3. भारतीय फलंदाजांचे अपयश
भारतीय सलामीवीर मयंक अगरवाल आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली होती. पण मयंक 22 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली 21, श्रेयस अय्यर 2 आणि केएल राहुल 12 धावांवर बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण सलीमीवीर शिखर धवनला(74) अष्टपैलू हार्दिक पंड्याची(90) चांगली साथ मिळाली. या दोघांनी अर्धशतके ठोकली. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने अखेर भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
बेयरस्टोचे तुफानी अर्धशतक; इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
‘आम्हाला **** फरक पडत नाही’, भारतीय दिग्गजाने घेतला पाकिस्तानी पत्रकाराचा समाचार