दिग्गज विराट कोहलीने आज (12 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (Virat Kohli Retired From Test Cricket) कोहलीने भावनिक पोस्ट लिहून त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विराटच्या निवृत्तीने कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले. पण, प्रश्न असा आहे की पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या कोहलीने वयाच्या 36व्या वर्षी अचानक निवृत्ती का जाहीर केली? चला तर मग कोहलीने त्याच्या आवडत्या फॉर्मेटला निरोप देण्याची 3 संभाव्य कारणे जाणून घेऊया.
खराब फॉर्ममुळे निर्माण झालेला दबाव- विराट कोहली बराच काळ खराब फॉर्मशी झुंजत होता. वनडे सामन्यांमध्ये विराटच्या बॅटमधून धावा येत होत्या, परंतु कसोटीत धावांचा दुष्काळ संपत नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत विराट पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली. खराब फॉर्ममुळे विराटवर दबाव वाढत होता. रोहित शर्माने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यावर हा दबाव आणखी वाढला.
वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रित करणे- असे मानले जाते की विराट कोहली 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू इच्छित होता आणि कदाचित याच कारणास्तव त्याने कसोटी क्रिकेटला निरोप देण्याचा निर्णय घेतला. विराटने टी20 फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. कोहलीला वनडे फॉरमॅट खूप आवडतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीची कामगिरी देखील अद्भुत होती.
मानसिक आणि शारीरिक थकवा- मानसिक आणि शारीरिक थकवा हे देखील विराट कोहलीच्या निवृत्तीचे एक प्रमुख कारण मानले जाते. कोहली गेल्या 15 वर्षांपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. 5 दिवसांच्या कसोटी सामन्यात खूप थकवा असतो आणि स्वतःला सतत ताजेतवाने ठेवणे सोपे नसते. कदाचित याच कारणामुळे कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी 2011 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान विराटने 210 डावात 46.85च्या सरासरीने फलंदाजी करताना 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत.






