भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याकडून बॅट भेट मिळवण्याचे अनेक तरुण क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. अलीकडेच विराटने भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप याच्या चेन्नई कसोटीतील प्रदर्शनावर प्रभावित होऊन त्याला बॅट भेट दिली आहे. आता विराटच्या या खास भेटीबाबत आकाशदीपने प्रतिक्रिया दिली आहे. विराटने भेट दिलेल्या बॅटने आपण कधीही क्रिकेट खेळणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने खेळण्यास आकाश दीपने का नकार दिला?
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने सांगितले की, भारतीय संघाचा स्टार विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने तो कधीही खेळणार नाही. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोहलीचे आभार मानले आणि ही बॅट अनमोल असल्याचे सांगितले.
आकाशने सांगितले की, त्याने ही बॅट कोहलीला मागितली नव्हती, तर कोहलीने त्याला स्वतःच्या इच्छेने ही बॅट भेट दिली होती. या वेगवान गोलंदाजाने सांगितले की, भारताचा माजी कर्णधार विराटला नक्कीच आपल्यात फलंदाजीचे कौशल्य असल्याचे जाणवले असावे. त्यामुळे त्याने आपल्याला ही संस्मरणीय भेट दिली असे आकाशदीपचे म्हणणे आहे.
आकाशदीप म्हणाला की, विराट भैय्याने स्वतः बॅट दिली होती. त्याला माझ्या फलंदाजीत काहीतरी दिसले असेल. एके दिवशी तो अचानक माझ्या खोलीत आला आणि विचारले, ‘तुला बॅट हवी आहे का?’ विराट भैय्याकडून बॅट कोणाला नको असेल? तो एक महान फलंदाज आहे. त्याचे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला ती बॅट हवी होती. त्याने मला विचारले की मी फलंदाजी करताना कोणत्या प्रकारची बॅट वापरतो, आणि मी फक्त हसलो, कारण माझ्याकडे शब्दांची कमतरता होती.
मग तो म्हणाला हे घे, ही बॅट ठेव. मी त्या बॅटने कधीच खेळणार नाही. विराट भैय्याकडून ही एक उत्तम भेट आहे आणि मी ती माझ्या खोलीच्या भिंतीवर स्मृतीचिन्ह म्हणून ठेवणार आहे. मी बॅटवर त्याचा ऑटोग्राफही घेतला आहे, असेही आकाशदीपने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?